मिलींद मेस्त्री यांची “मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेच्या”अध्यक्षपदी निवड

*कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना समिती गठीत

*पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर प्रगतशील शेतकरी सदस्य, अध्यक्ष, समिती स्थापन

कणकवली :
कणकवली कलमठ येथील आणि कणकवली भाजपा तालुका अध्यक्ष मिलींद मेस्त्री यांची “मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेच्या” कणकवली विधानसभा क्षेत्रीय समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी नियुक्तीचे पत्र जारी केले आहे.

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना अंतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी क्षेत्रस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा विकास, शेतमाल वाहतुकीसाठी सुलभ रस्ते निर्माण करणे तसेच योजनेच्या अंमलबजावणीत गती आणणे हा समिती स्थापनेमागील उद्देश आहे.

समितीच्या अध्यक्षपदी मिलिंद चंद्रकांत मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली असून उपविभागीय अधिकारी, कणकवली यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. समितीत उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार (कणकवली, देवगड, वैभववाडी), गटविकास अधिकारी, भूमी अभिलेख विभाग अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंते, जिल्हा परिषद बांधकाम विभाग अधिकारी व पंचायत समिती लेखाधिकारी यांचा समावेश आहे.

तसेच प्रगतशील शेतकरी सदस्य म्हणून सिद्धी उत्तम वारंग (सावडाव), अनिल मनोहर पेडणेकर (चिंचवली), जनार्दन तेली (वाघोटन), विद्याधर जोशी (देवगड) आणि महेश रामचंद्र संसारे (मांगवली) यांची निवड करण्यात आली आहे.

शासन आदेशानुसार समितीने किमान दर तीन महिन्यांनी बैठक घेणे बंधनकारक राहणार असून मंजूर कामांचा मासिक प्रगती अहवाल जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावा लागणार आहे. हा आदेश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जारी केला आहे.