सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग येथील आंबा-काजू बागायतदारांना मिळणार पीक विम्याची रक्कम : अण्णा केसरकर

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील आंबा-काजू बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पीक विम्याच्या रकमेसाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी केलेल्या अथक पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. विमा कंपनीने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न देण्याबाबत केलेले अपील कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांनी फेटाळून लावले असून, लवकरच तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळणार असल्याची माहिती अण्णा केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, सन २०२२-२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील आंबा-काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांनी आपल्या बागायतींचा फळपीक विमा संबंधित कंपनीकडे भरणा केला होता. मात्र, तांत्रिक बाबींचे कारण देत विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या नुकसानीची विम्याची रक्कम देण्यास नकार दिला होता.
त्यानंतर या अन्यायकारक भूमिकेविरोधात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर यांनी कृषी विभाग आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागितली. यानंतर झालेल्या संयुक्त बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले होते, तरीही विमा कंपनीने रक्कम अदा केली नाही. उलट, विमा कंपनीने कृषी विभागाकडे अपील करून आपण शेतकऱ्यांना रक्कम देऊ शकत नसल्याचे सांगितले.
यावर अण्णा केसरकर यांनीही विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कशी देऊ शकते, याबाबत आपले म्हणणे मांडत अपील दाखल केले. या प्रकरणावर नुकतीच मंत्रालयात कृषी प्रधान सचिव विकास रस्तोगी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला कृषी आयुक्त सुरज मांढरे, कोकण विभागाचे बालाजी ताठे यांच्यासह आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर उपस्थित होते.

या बैठकीत अण्णा केसरकर यांनी विमा कंपनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम कशी देऊ शकते, हे प्रभावीपणे निदर्शनास आणून दिले. त्यांनी “विम्याचे पैसे भरूनही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नसेल, तर शेतकऱ्यांनी करायचे काय?” असा सवाल उपस्थित करत, तांत्रिक अडचण ही संबंधित विमा कंपनीचीच असल्याचे ठामपणे सांगितले. आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांनीही आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी सविस्तर मांडल्या.
या सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर कृषी प्रधान सचिव श्री. रस्तोगी यांनी विमा कंपनीचे अपील फेटाळून लावत, संबंधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाईची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले. या यशामध्ये शेतकरी संघटनेचे संजय राऊळ आणि कोचरा सरपंच योगेश तेली यांचेही विशेष प्रयत्न कारणीभूत ठरले.
या निर्णयामुळे तीन वर्षांपासून पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो आंबा-काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून, शेतकरी संघटनेच्या लढ्याला अखेर न्याय मिळाल्याची भावना अण्णा केसरकर यांनी व्यक्त केली.