वैभववाडी पोलिसांची करुळ नाक्यावर मोठी कारवाई
वैभववाडी प्रतिनिधी :
गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई करुळ चेक नाका येथे सोमवारी रात्री ३ वा. केली आहे. ट्रक चालक व मालक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राकेश राजू हडपद व निलेश साहेबराव साळुंखे रा. शिरोळ कोल्हापूर अशी त्यांची नावे आहेत. ट्रकमधून सुमारे २३ लाख ५२ हजार रुपयांची गोवा बनवटीची दारू व सुमारे १८ लाख रुपये किंमतीचा ट्रक असा ४१ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोमवारी करूळ चेक नाका येथे पोलीस कॉन्स्टेबल हरिष जायभाय, अजय बिल्पे ड्युटीवर कार्यरत होते. रात्री गोव्याहून कोल्हापूर कडे जाणारा ट्रक तपासणीसाठी थांबावला. चालकांकडे चौकशी केली असता ते कधी नागपूरला व नंतर कोल्हापूरला जात आहे. अशी विसंगत व उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ट्रकच्या हौदयात पाहिले असता, ट्रक मध्ये दारूचे बॉक्स असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याबाबत वैभववाडी पोलीस ठाणेत माहिती दिली. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस किरण मेते हे तात्काळ करूळ चेक नाका येथे दाखल झाले. ट्रकचा पंचनामा करून ट्रक पोलीस ठाणेत आणून दारूची मोजदाज करण्यात आली. ट्रॅकमधून ७०० बॉक्स, (प्रत्येक बॉक्स मध्ये १८० मिली च्या ४८ बॉटल होत्या) असा सुमारे २३ लाख ५२ हजार रुपयांची दारू व १८ लाखाचा ट्रक असा सुमारे ४१ लाख ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आठ दिवसात गोवा बनावटीच्या दारुवर ही दुसरी कारवाई वैभववाडी पोलिसांनी केली. आठ दिवसापूर्वी कुसूर येथे पाच लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त केली होती. आतापर्यंतची गोवा बनावटीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.













