देवगड चा विकास गतिमान करून देवगड आदर्श बनवू : मंत्री नितेश राणे 

दहिबाव अन्नपूर्णा योजनेच्या पाईपलाईन दुरुस्ती कामाचा भूमिपूजन सोहळा पार 

नऊ कोटी बारा लाख खर्चाचे अंदाजपत्रक

देवगड l प्रतिनिधी :दहिबांव नळयोजनेच्या पाईपलाइन दुरुस्तीच्या कामामुळे भविष्यात देवगड-जामसंडेचा पाणीपुरवठा सुरळीत सुरू राहील. देवगड-जामसंडेवासियांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी मोठी योजना राबवावी लागेल, त्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहोत, महायुतीच्या सरकारमध्ये निधी कमी पडणार नाही आपण जास्तीत जास्त निधी देवगडला देऊन देवगडचा विकास गतिमान करू व देवगड आदर्श बनवू अशी ग्वाही राज्याचे मत्स्योद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी दिली.

 

देवगड-जामसंडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दहिबांव नळपाणी योजनेच्या पाईपलाइन दुरुस्तीच्या कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत ९ कोटी २१ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ जामसंडे वेळवाडी सडा येथील बांधण्यात आलेल्या ६.५ लाख लिटर क्षमतेच्या साठवण टाकी येथे मंगळवारी सायंकाळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी साठवण टाकीचा लोकार्पण सोहळाही संपन्न झाला.

 

या कार्यक्रमाला माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, बाळा खडपे, भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, बंड्या नारकर, नगराध्यक्षा साक्षी प्रभू, उपनगराध्यक्षा सौ. मिताली सावंत, मुख्याधिकारी गौरी पाटील, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, नगरसेविका सौ. तन्वी चांदोस्कर, सौ. प्रियांका साळसकर, गटनेते शरद ठुकरूल, नगरसेवक बुवा तारी, संतोष तारी, रोहन खेडेकर, सौ. आद्या गुमास्ते, रूचाली पाटकर, स्वरा कावले, एकनाथ तेली, सौ. तन्वी शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

या कामामुळे देवगड-जामसंडेवासियांना वारंवार भेडसावणाऱ्या नळयोजना दुरुस्तीचा प्रश्न सुटून पाणीपुरवठा सुरळीत राहील. या कामासाठी ९ कोटी २१ लाख रुपये निधी मंजूर करून देण्यात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा वाटा आहे. त्यांना फोन केल्यानंतर त्यांनी तात्काळ फाईलवर सही करून निधी मंजूर केला. त्यामुळे आपण त्यांचे आभार मानतो, असे राणे यांनी सांगितले.

 

दुरुस्तीच्या कामामुळे नागरिकांच्या तक्रारी कमी होतील, अशी अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली. हे काम वेळेवर आणि चांगल्या दर्जाचे होईल, यात शंका नाही. मात्र, कामाच्या गुणवत्तेसाठी नगराध्यक्षा व सर्व लोकप्रतिनिधींनी लक्ष ठेवावे, असेही ते म्हणाले. या कामामुळे पुढील सहा ते आठ महिन्यांत नागरिक तक्रारी करण्याऐवजी समाधान व्यक्त करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

महायुतीचे सरकार हे गतीमान सरकार असून, तुमचा आमदार आता मंत्री झाला आहे आणि पालकमंत्री म्हणून काम करत आहे. त्यामुळे विकासकामांना वेग येण्याचा काळ सुरू झाला आहे. विरोधासाठी विरोध करण्याचे दिवस गेले आहेत. सर्वजण एकत्र येऊन देवगडचा विकास करूया, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी केले, तर आभार शरद ठुकरूल यांनी मानले. टाकीसाठी जागा देणाऱ्या जागा मालक मालवणकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, अ‍ॅड. अजित गोगटे आणि मुख्याधिकारी गौरी पाटील यांनीही आपले विचार व्यक्त केले.