सरचिटणीसपदी जे.डी. पाटील : नवीन कार्यकारिणी जाहीर
सावंतवाडी | प्रतिनिधी : राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा सिंधुदुर्गची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी विठ्ठल कदम यांची, तर जिल्हा सरचिटणीसपदी जे.डी. पाटील यांची निवड झाली आहे.
मालवण येथील रघुनाथराव देसाई विद्यालयाच्या सभागृहात मावळते जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा संपन्न झाला. संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर आणि राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष विठ्ठल कदम यांनी सांगितले की, राज्य व राष्ट्रीय पुरस्कार जिल्हा संघटनेच्या वतीने शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच, राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षकांनी राबवलेल्या विद्यार्थी हिताच्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी शासनामार्फत व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल.
नवीन कार्यकारिणीला राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर आणि राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे यांनी निवडपत्र व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीत विविध पदांवर निवड
सिंधुदुर्ग जिल्हा आदर्श शिक्षक संघटनेच्या जाहीर झालेल्या नवीन कार्यकारिणीत अनेक शिक्षकांना विविध जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. यात संदीप शिंदे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी तर स्नेहलता राणे यांची जिल्हा कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
जिल्हा उपाध्यक्ष म्हणून आनंद बामणीकर, संजय रासम, प्रदीप मांजरेकर आणि सुषमा मांजरेकर यांची नियुक्ती झाली आहे. प्रसिद्धी प्रमुखपदाची जबाबदारी उदय गोसावी यांच्याकडे देण्यात आली असून, जिल्हा संघटक म्हणून आनंद जाधव आणि श्यामसुंदर सावंत हे काम पाहणार आहेत.
याशिवाय, जिल्हा सल्लागार मंडळात संजीव राऊत, प्रकाश सावंत, प्रकाश घोगळे, रावजी परब, नंदन घोगळे, सोनाली सावंत आणि किशोर वालावलकर यांचा समावेश करण्यात आला आहे. संघटनेचे मावळते जिल्हाध्यक्ष शिवराज सावंत यांची राज्य सल्लागार व जिल्हा नेतेपदी निवड करून त्यांच्या अनुभवाचा लाभ संघटनेला घेता येणार आहे.








