दापोली । राकेश कोळी
दापोली शहरातील फॅमिली माळ येथे संरक्षक भिंत कोसळल्याने येथील घराला धोका निर्माण झाला आहे.
दापोलीत सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने पावसामुळे दापोली शहरातील फॅमिली माळ परिसरात संरक्षक भिंत कोसळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे मकबुल कासम कोंडविलकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.
फॅमिली माळ परिसरात दरड ‘कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. मात्र, याकडे प्रशासनाने अद्याप लक्ष दिलेले नाही, अशी स्थानिकांची तक्रार आहे. त्यातच गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास येथील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे येथीलच कोंडविलकर यांच्या घराला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी स्थलांतर करण्याची तयारी दाखवली असून, तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी भेट देऊन प्रशासनाने तत्काळ बचाव आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाने याठिकाणी भेट देऊन उपाययोजना करण्याची मागणी होत आहे












