ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान – बजरंग दलाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी : दहावीची परीक्षा संपून सुमारे अडीच महिने झाले तरी अनेक विद्यार्थ्यांना अद्याप अकरावीच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश मिळू शकलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षण कधी सुरू होईल, हेही अनिश्चितच आहे. अकरावी प्रवेशासाठी सुरू केलेली ऑनलाइन प्रक्रियेमुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्व अडचणी दूर करून शिक्षण लवकर सुरू करण्याची मागणी करत बजरंग दलाच्या रत्नागिरी विभागातर्फे निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी गेले साडेचार महिने ऑनलाइन अडचणींशी झुंजत आहेत. प्रवेश प्रक्रिया त्रुटीपूर्ण असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मौल्यवान मनुष्यबळ फक्त प्रवेश घेण्यात खर्ची पडत आहे. ही परिस्थिती विकसित भारताच्या संकल्पनेत बसणारी नाही. सरकारने सुरू केलेली ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रिया घरबसल्या प्रवेश मिळावा या हेतूने सुरू झाली असली, तरी ती विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी त्रासदायक ठरत आहे.

प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासूनच तांत्रिक अडचणी, अपूर्ण यादी, माहितीची गोंधळलेली स्थिती आणि वेळापत्रकातील अकार्यक्षमता यामुळे ही यंत्रणा वेळखाऊ आणि अनिश्चित झाली आहे. आतापर्यंत केवळ दोनच वेळा प्रवेश यादी प्रसिद्ध झाल्या असून, त्यातून फक्त ४०% विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे चांगले गुण मिळवूनही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असून, त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

या निवेदनाद्वारे बजरंग दलाने सरकारकडे मागणी केली आहे की, अकरावी प्रवेश प्रक्रियेतील सर्व तांत्रिक अडथळे त्वरित दूर करून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर शैक्षणिक सुविधा आणि वर्ग शिक्षण सुरू करावे.

यावेळी बजरंग दलाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक विराज चव्हाण, विश्व हिंदू परिषदेचे अधिवक्ता सचिन रेमणे आणि गौरव झगडे उपस्थित होते.