सावंतवाडी । प्रतिनिधी : नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेतर्फे शिक्षकदिनानिमित्त जिल्ह्यातील दोन उपक्रमशील शिक्षकांना उपक्रमशील शिक्षक पुरस्कार प्रदान करून गौरविले जाते. हे पुरस्कार ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी जाहीर केले जातात. येत्या शैक्षणिक वर्षातही असे दोन पुरस्कार प्रदान करावयाचे असल्यामुळे जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांनी आपल्या माहितीचे प्रस्ताव १५ ऑगस्ट पर्यंत संस्थेकडे पाठवावेत असे आवाहन नेमळे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आत्माराम भिकाजी राऊळ यांनी केले आहे.
यालील पहिला पुरस्कार हा गुरुवर्य कै. ज. भा. पेंढारकर यांच्या स्मरणार्थ श्रीमती नलिनी ज. पेंढारकर यांनी पुरस्कृत केला असून या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील उपक्रमशील पुरुष शिक्षकांनीच आपल्या माहितीचे प्रस्ताव पाठवावयाचे आहेत. दुसरा पुरस्कार हा सहकारमहर्षी कै. शिवरामभाऊ जाधव यांच्या पत्नी कै. प्रमिला शिवराम जाधव यांच्या स्मरणार्थ सहकारमहर्षींच्या मित्र परिवाराने पुरस्कृत केला असून या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील केवळ शिक्षिकांनीच आपले प्रस्ताव पाठवावयाचे आहेत.
पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र असे आहे. शिक्षकांनी आपल्या माहितीचे प्रस्ताव १५ ऑगस्टपूर्वी आपल्या दोन छायाचित्रांसह प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर, नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नेमळे यांच्याकडे पाठवायचे आहेत, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.









