कारगिल युद्ध ही केवळ लढाई नव्हती,ती शौर्य, त्याग व कर्तव्यनिष्ठेची परीक्षा होती.– सुभेदार मेजर कुलदीपकर

फोंडाघाट महाविद्यालयात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा — वीर शूरवीरांचा गौरव, विद्यार्थ्यांचा सन्मान

फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने वीर सैनिकांच्या शौर्यगाथांचा सन्मान करत आणि नव्या पिढीत राष्ट्रप्रेम जागवणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम मेरा युवा भारत, सिंधुदुर्ग व कला आणि वाणिज्य महाविद्यालय, फोंडाघाट येथील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात देशभक्तीचा उत्स्फूर्त आविष्कार पाहायला मिळाला.

 

 

कार्यक्रमाची सुरुवात सॉर्जेंट रिया मेस्त्री, कॅडेट प्रिया मेस्त्री व कॅडेट कोमल मेस्त्री यांच्या देशभक्तिपर गीताने झाली. त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे मन भारावले. संपूर्ण वातावरण देशप्रेमाच्या भावनेने भारून गेले.

 

 

 

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण कारगिल युद्धाचे अनुभवी योद्धे सुभेदार मेजर सुधाकर कुलदीपकर व हवालदार मारोती कांबळे यांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना 58, महाराष्ट्र बटालियन एनसीसी सिंधुदुर्गचे सुभेदार मेजर कुलदीपकर यांनी कारगिल युद्धाच्या अनुभवाचे सामर्थ्यशाली वर्णन करत सांगितले, “कारगिल युद्ध हे केवळ लढाई नव्हती, तर ती शौर्य, त्याग व कर्तव्यनिष्ठेची परीक्षा होती. हिमालयातील बिकट परिस्थितीत लढताना देशाचे रक्षण हेच जवानाने एकमेव ध्येय मानले. तुम्हीही तुमच्या जीवनात देशसेवा ही सर्वोच्च मूल्य म्हणून अंगीकारा असे सांगितले.

 

 

 

कार्यक्रमात आयोजित वक्तृत्व स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशप्रेम, वीर जवानांचे बलिदान आणि शौर्य यावर भाष्य केले. यामध्ये कु. नीता धुरी -प्रथम क्रमांक, कु. कोमल जोईल — द्वितीय क्रमांक, कु. कोमल मेस्त्री — तृतीय क्रमांक या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी केली. सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रा. डॉ. संतोष रायबोले व प्रा. संतोष आखाडे यांनी स्पर्धेचे परीक्षण करत विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

 

 

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. पुरंदर नारे यांनी मनोगतात सांगितले की, कारगिल विजय दिन हा फक्त आठवणींचा दिवस नाही, तर शूर सैनिकांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वातंत्र्याचे भान ठेवणारा दिवस आहे. विद्यार्थी ही प्रेरणा आत्मसात करून सजग नागरिक बनावेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट डॉ. राज ताडेराव यांनी करताना भारतीय सैन्याच्या पराक्रमाची आठवण करून दिली. त्यांनी कारगिल युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जवानांनी दिलेल्या शौर्यदायी योगदानाचे वर्णन करत, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अस्मिता जागवली. सीनियर अंडर ऑफिसर कोमल जोईल हिने प्रभावी सूत्रसंचालन करत कार्यक्रमाचे संयोजन सांभाळले, तर ज्युनियर अंडर ऑफिसर सारिका येंडे हिने उपस्थितांचे आभार मानले.या प्रेरणादायी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, एनसीसी अधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, एनसीसी कॅडेट्स, मेरा युवा भारत सिंधुदुर्गच्या सौ. अपेक्षा मांजरेकर तसेच फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी व संचालक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

हा कार्यक्रम केवळ एक औपचारिक उपक्रम नव्हता, तर तो युवकांच्या मनामनात देशसेवेची भावना जागवणारा आणि शौर्यगाथांची आठवण करून देणारा सोहळा ठरला.