सावंतवाडी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज सोमवारी मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप-पत्रादेवी महामार्गावरील विविध समस्यांबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकारी वृषाली पाटील आणि मुकेश साळुंके यांची भेट घेतली. यावेळी, अपघातांना कारणीभूत ठरणारे रस्त्यांचे खराब काम आणि सुरू असलेल्या कामांच्या संथ गतीवर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली.
मनसेने निदर्शनास आणलेल्या प्रमुख समस्यांमध्ये बांदा येथील पुलावरील पथदिव्यांची समस्या अग्रस्थानी होती. महामार्गाचे काम अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे असून, रस्ते खड्डेमय झाल्याचेही त्यांनी सांगितले. कामाची संथ गती आणि मळगावमधील गावात जाणारे अपूर्ण साईड रस्ते यामुळे स्थानिक लोकांना मोठा त्रास होत असून, या रस्त्यांवर अनेक अपघातही झाल्याचे मनसेने नमूद केले.
याशिवाय, महामार्गावर सार्वजनिक शौचालयांचा अभाव आणि अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून होणारे अपघात याबद्दलही त्यांनी अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. मनसेने या अपघातांना आणि अपूर्ण कामांना कोण जबाबदार आहे, असा प्रश्न उपस्थित केला.
मनसे शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना कामे सुरू असताना स्वतः लक्ष देऊन ती पूर्ण करण्याची मागणी केली.
मात्र, अधिकारी पाटील आणि साळुंके यांनी लवकरच महामार्गाची पाहणी करून सर्व कामे मार्गी लावू, असे आश्वासन दिल्याचे मनसेने म्हटले आहे.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष मिलींद सावंत, शहराध्यक्ष ॲड. राजू कासकर, विभागध्यक्ष काशिराम गावडे, उपविभागध्यक्ष राकेश परब, आशुतोष राऊळ आणि मंदार परब उपस्थित होते.
मनसे शिष्टमंडळाने महामार्गाच्या कामाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत, अपघातांना कारणीभूत ठरणारी धोकादायक रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून लोकांना सुरक्षित प्रवासासाठी रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी केली. अन्यथा, मनसे याविरोधात तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही शिष्टमंडळाने दिला आहे.












