सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर सावंत यांना सिंधुदुर्ग पोलीस दलाची मानवंदना

देवसू येथे शेकडोंच्या उपस्थितीत पार्थिवावर अंत्यसंस्कार 

पोलीस दलाच्या नव्या आदेशाची सिंधुदुर्गात प्रथमच अंमलबजावणी

सावंतवाडी । प्रतिनिधी : देवसू येथील रहिवासी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर सावंत यांचे काल सोमवारी गोवा बांबोळी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २१ जुलै, २०२५ रोजी जारी केलेल्या सुधारित आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच एका सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यास पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली, ही एक लक्षणीय घटना ठरली.

मनोहर सावंत हे १९७६ साली मुंबई एस.आर.पी.एफ. ग्रुप ८ मध्ये भरती झाले होते. त्यानंतर, १९८२ साली त्यांची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस खात्यात बदली झाली. त्यांनी वैभववाडी, बांदा आणि ओरोस या पोलीस ठाण्यांमध्ये सेवा बजावत २०११ साली सिंधुदुर्ग पोलीस दलातून सन्मानपूर्वक सेवानिवृत्ती स्वीकारली होती.

गेले काही दिवस त्यांच्यावर गोवा बांबोळी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातच काल उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी वनिता सावंत, पुत्र प्रा. रवींद्र सावंत, कन्या, जावई, भाऊ अशोक नारायण सावंत, पुतणे एकनाथ पुंडलिक सावंत, रामा पुंडलिक सावंत, संजय वसंत सावंत, सुरेश वसंत सावंत, मेघनाथ वसंत सावंत असा मोठा परिवार आहे.

*पोलीस दलाची आदरांजली:*

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना व समाजातील इतर नागरिकांना त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेची आठवण व्हावी, त्यांचा गौरव व्हावा आणि सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार व्हावेत या उद्देशाने २१ जुलै, २०२५ रोजी सुधारित आदेश व नियमावली जारी केली होती. या आदेशाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच पालन करत, मनोहर सावंत यांच्या पार्थिवावर सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार, उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे आणि सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पोलीस हवालदार दीपक शिंदे, संतोष गलोले आणि मनीष शिंदे यांनी आज देवसू येथे उपस्थित राहून मनोहर सावंत यांना आदरांजली वाहिली. तसेच, सिंधुदुर्ग पोलीस दलातर्फे शोकसंदेश त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला.

यावेळी पोलीस पाटील प्रवीण सावंत, सरपंच रुपेश सावंत, माजी सैनिक डॉ. लवू सावंत यांच्यासह देवसू आणि पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.