रत्नागिरी जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेची मागणी.
रत्नागिरी:
वर्षी मोठा गाजावाजा करून अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यापूर्वी फक्त महानगरात असणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला शिक्षक संघटना, पालक- विद्यार्थी यांचा विरोध असतानाही संपूर्ण राज्यभर ही प्रक्रिया राबवण्याचा हा निर्णय झाला. परंतु यामध्ये अनेक उणीवा राहिल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.अनेक नामांकित महाविद्यालयांमध्ये,ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक महाविद्यालयांमध्ये अपेक्षित ऍडमिशन्स झाली नाहीत. म्हणून विशेष फेरीत प्रवेशाचे अधिकार प्राचार्यांना मिळावेत अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक श्री. बी. आर.पाटील आणि सचिव प्राध्यापक श्री. दिलीप जाधव यांनी पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे केली आहे. यावर्षी दहावीचा निकाल 13 मे रोजी लागूनही अद्याप कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रवेश अकरावीचे अध्यापन सुरू झालेलं नाही. दिनांक 29 जून ते 25 जुलै पर्यंत या संपूर्ण राज्यभराच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयाचा, पर्यायाने शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांच्या वेळेचा अपव्यय केवळ प्रवेशासाठी होऊन समाधानकारक प्रवेश संख्या पाठवण्यात आलेली नाही. तिसऱ्या फेरीत बोटावर मोजण्याएवढ्या विद्यार्थ्यांची यादी महाविद्यालयांना देण्यात आली आहे. फार मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि पालक प्रवेशासाठी आतुर झाले आहेत. रत्नागिरी जिल्हा हा बहुतांशी डोंगराळ भागाचा असून ऑनलाईन प्रवेश अर्ज वेळोवेळी अपडेट करण्यासाठी नेटवर्कची समस्या असल्याने पालकांना शहराकडे धाव घ्यावी लागते व नाहक आर्थिक बोजा सहन करावा लागतो.तसंच उशिरा प्रवेशामुळे विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळेल की नाही याचीही चिंता सतावत आहे. आता महाविद्यालय तसेच पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालेलं असून ग्रामीण, शहरी आणि निमशहरी भागात अनुदानित वर्गाच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहण्याची भीती निर्माण झाली आहे. जर ऑफलाइन प्रवेश झाले असते. तर 26 जूनला संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊन 11 वी चा वर्ग नियमितपणे सुरू झाले असते. परंतु या प्रवेश प्रक्रियेमुळे गरीब मुलांना शिकण्यासाठी ताटकळत ठेवण्यात आले आहे.अशा प्रकारे शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या वेळेचा व पैशाचा अपव्यय करून मानसिक व शारीरिक त्रास देणारी प्रवेश प्रक्रिया बंद करावी अशा मागणीचे निवेदन रत्नागिरी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीम. शिरभाते व प्रशासकीय अधिकारी , श्रीम. परवीण तडवी. यांना देण्यात आले .यावेळी संघटनेचे सचिव प्रा. दिलीप .सदस्य प्रा.श्री. दत्तात्रय माळवदे.उपस्थित होते.











