राणे साहेबांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकसंघ!

आमचे टार्गेट उबाठा ; शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी मांडली भुमिका

मालवण | प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे साहेब यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकसंघ आहे. पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे हे सिंधुदुर्गाचे कुटुंब एकत्रित ठेवण्यासाठी सक्षम नेतृत्व आहे. राणे कुंटुंबियांवर टिका करून आजपर्यंत आपली कारकिर्द करणाऱ्या उबाठाच्या काही नेत्यांना त्यांची जागा दाखवून देणार. आमच्यासाठी उबाठा हेच टार्गेट आहेत. त्यांचे पक्ष प्रवेश होत आहेत. सोबत राणे साहेबांच्या मार्गदर्शनात जनसेवा सुरु आहे. मी प्रामाणिकपणे माझ्या पक्षासाठी काम करत असताना महायुती खासकरून खा. नारायण राणे साहेब यांचा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या आदेश माझ्यासाठी महत्वाचा आणि अंतिम असेल. अशा शब्दात शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी भुमिका मांडली.

 

राणे साहेबांवर, आमदार निलेश राणे यांच्यावर प्रेम असणारे अनेक कार्यकर्ते आमच्या सोबत जोडले जात आहेत. मात्र कोणत्याही भाजपा कार्यकर्त्याला आम्ही शिवसेनेत प्रवेश घेत नाही. आमचे लक्ष उबाठा हेच आहे. असेही शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले.

 

मालवण येथील आमदार निलेश राणे संपर्क कार्यालयात दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहरप्रमुख दिपक पाटकर, उपतालुका प्रमुख बाळू नाटेकर, अरूण तोडणकर, महेश सारंग, राजू बिडये, भाई मांजरेकर, आबा शिरर्सेकर, शानू वालावलकर आदी उपस्थित होते.

 

राणे साहेबांच्या नेतृत्वात आमची जनतेच्याप्रती सामाजिक बांधीलकी कायम आहे. पैसे देऊन आम्ही कोणाचाही प्रवेश घेतलेला नाही. विधायक कामे पूर्ण करण्याचा शब्द आम्ही देत आहोत. स्वतःहून आमच्याकडे येत अनेक प्रवेश होत आहेत, यात आमचा काय दोष असाही सवाल श्री. सामंत यांनी उपस्थित केला आहे.

 

स्वयंघोषित मच्छीमार नेत्यांनी तळाशिलमध्ये निर्माण झालेल्या सागरी अतिक्रमणावेळी त्याठिकाणी जाण्याचे सौजन्य दाखविले नाही. तीन दिवस गावातील लोक धोक्याच्या छायेत होते. कधीही गाव दोन भागात विभागले जाण्याची भिती होती. त्यावेळी कोणीही त्याठिकाणी फिरकले नाही. त्याठिकाणी आवश्यक असणारा बंधारा तात्काळ आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकारातून उभा करण्यास सुरूवात केली. त्यावेळी मच्छीमारांचे दुखः पुसण्यासाठी ही मंडळी गेली नाही, असेही श्री. सामंत म्हणाले.

 

मी आजपर्यंत फक्त उबाठाच्याच कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा प्रवेश शिवसेनेत घेतलेला आहे. माझ्यासोबत फिरावे म्हणजे त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांची म्हणणी समजून येतील. जनतेला विकासापासून गेले दहा वर्षे मागे ठेवणाऱ्या नेत्यांमुळेच उबाठाची आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे त्यांनी आमच्यावर टिका करण्यापेक्षा ही वेळ का आली? याचे आत्मपरिक्षण करावे आणि शांत बसावे, असाही टोला श्री. सामंत यांनी मारला आहे.

 

दत्ता सामंत पुढे म्हणाले, पालकमंत्री नितेश राणे यांनी मतदार संघात घेतलेली मेहनत आणि राजकारणामध्ये निर्माण केलेला आपला दबदबा यामुळे उबाठाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. यामुळे त्यांच्यावर टिका करण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करतं आहेत. नितेश राणे यांनी लहान वयात आमदार म्हणून यशस्वी होत आज कॅबीनेट मंत्री म्हणून यशस्वी कामगिरी करतं आहेत. उबाठाचे जिल्हयातील नेते आणि पदाधिकारी अकार्यक्षम असल्यानेच त्यांना आता महायुतीवर टिका करून आपले अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्न करतं असल्याचे सामंत म्हणाले.

 

*राणे साहेब आणि राणे कुटुंबियच माझ्यासाठी सर्वोच्च*

 

खासदार नारायण राणे साहेब आणि त्यांच्या कटुंबियांचे नाव नेहमीच उंच ठेवण्यासाठी माझा प्रयत्न राहिला आहे. मला राणे साहेबांनी नावारूपास आणले. आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्या कार्यातून कर्तृत्व सिद्ध केले. गेल्या पाच वर्षात आमदार नीलेश राणे यांनी मालवण कुडाळ मतदार संघात भाजपा संघटनेचे मजबुत जाळे निर्माण केले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे शिवसेना आमदार म्हणून विजयी झाल्या नंतर त्यांनी यशस्वी छाप सोडली. विधिमंडळ गाजवले. हजार कोटी पेक्षा जास्त विकासनिधी मालवण कुडाळ मध्ये आणला. जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले. आमदार नीलेश राणे यांच्या कामावर प्रेरीत होवून अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. पक्षप्रवेश, विकासकार्य आणि जनसेवा अशीच सुरु राहील. असेही दत्ता सामंत म्हणाले.