कासे येथील केदारनाथ संघाने पटकावला प्रथम क्रमांक
निलेश जाधव / देवरूख : संगमेश्वर तालुका शिवसेना आयोजित श्रावण महोत्सव कोकणी महिला पारंपरिक लोकनृत्य स्पर्धा महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात रविवारी देवरूख येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत कासे येथील केदारनाथ संघाने प्रथम क्रमांक पटकावला.
संगमेश्वर तालुका शिवसेना आयोजित श्रावण महोत्सव कोकणी महिला पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेचे रविवारी देवरूख येथील मराठा भवन येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार सुभाष बने यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश मुकादम, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे, माजी जि. प. अध्यक्षा रचना महाडिक, महिला संगमेश्वर तालुकाप्रमुख नेत्रा शिंदे, दिपा प्रभावळकर, सारिका जाधव, किरण जाधव, सचिन मांगले, वैभव पवार, बबन बोदले आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ही स्पर्धा अतिशय उत्तमप्रकारे मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थितांनी महिलांच्या प्रत्येक नृत्याला टाळ्यांच्या गजरात दाद दिली. दिवसभर चाललेल्या या स्पर्धेत वरदान देवी कडवईने द्वितीय क्रमांक, संगमेश्वरमधील अमृता ग्रुपने तिसरा क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ म्हणून धनी देवी तळवडे संघाची निवड करण्यात आली. उपस्थित महिलांमधून लकी ड्राॅ काढण्यात आला. यामध्ये देवरुखमधील देवयानी विंचू यांना पैठणी बक्षिस मिळाली. सर्व विजेत्या महिला संघांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेच्या माध्यमातून शिवसेनेने महिलांना एक चांगले व्यासपीठ मिळवून दिले. एकंदरीत महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.











