रत्नागिरी:
रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर स्वायत्त महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने जागतिक कांदळवन दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. दरवर्षी २६ जुलै रोजी ‘जागतिक कांदळवन दिवस’ साजरा केला जातो.
यावर्षी, विद्यार्थ्यांना कांदळवन परिसंस्था आणि त्यांचे महत्त्व समजावून देण्यासाठी, २५ जुलै २०२५ रोजी रनपार येथील कांदळवन परिसंस्थेला भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांनी तेथील कांदळवन आणि सहयोगी कांदळवनाच्या प्रजाती, तसेच तेथील फुलोरा याबद्दल माहिती मिळवली.
कांदळवनांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, २६ जुलै २०२५ रोजी महाविद्यालयातील डॉ. ज. शं. केळकर सभागृहात विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. प्रा. शरद आपटे यांनी ‘रत्नागिरीतील कांदळवनांची विविधता’ या विषयावर मार्गदर्शन केले. वनस्पतीशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. मंगल पटवर्धन यांनी चीपी, मारंडी, कांदळ यांसारख्या प्रमुख कांदळ वनस्पती तसेच सागरगोटा, कडूमेहंदी, करंज यांसारख्या सहयोगी वनस्पतींची ओळख करून दिली. डॉ. पटवर्धन यांच्या “मी खारफुटी” या कवितेने पर्यावरणातील खारफुटीची भूमिका आणि संवर्धन यावर प्रकाश टाकला. व्याख्यात्यांनी विद्यार्थ्यांना या परिसंस्थेतील अनेक आश्चर्यकारक गोष्टींची माहिती दिली.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि व्याख्यात्यांचे स्वागत विभाग प्रमुख डॉ. सोनाली कदम यांनी केले. डॉ. विराज चाबके यांनी व्याख्यात्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. परेश गुरव यांनी केले, तर प्रा. प्रियंका शिंदे-अवेरे यांनी आभार प्रदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले, तर उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.












