रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ला जारी

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि भारत मौसम विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०२५ या कालावधीसाठी हवामानावर आधारित कृषी सल्ला जारी करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, २९ व ३० जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर ३१ जुलै ते २ ऑगस्ट रोजी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र, ०३ ते ०९ ऑगस्ट २०२५ दरम्यान कोकण विभागात पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज (विस्तारित श्रेणी अंदाज) वर्तवण्यात आला आहे.
मागील आठवड्यातील हवामान (२२ जुलै ते २८ जुलै २०२५):
गेल्या आठवड्यात दापोली येथील कृषी हवामान वेधशाळेनुसार, एकूण ४३८.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. या वर्षातील एकूण पाऊस २९४०.७ मिमी झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ४३०८.३ मिमी पावसापेक्षा कमी आहे. कमाल तापमान २६.७°C ते २८.४°C आणि किमान तापमान २०°C ते २१.५°C दरम्यान होते. ढगाळ वातावरण होते आणि वाऱ्याचा वेग ५.३ ते १३.४ किमी/तास होता.
शेतकऱ्यांसाठी विशेष सल्ला:
सध्याच्या हवामानाचा विचार करता, शेतकऱ्यांनी काही विशिष्ट उपाययोजना करणे आवश्यक आहे:
* भात पीक:
* पुनर्लागवडीची कामे पावसाची तीव्रता कमी असताना पूर्ण करावीत.
* १२ ते १५ सेंमी उंचीची आणि ५ ते ६ पाने फुटलेली, २१ ते २७ दिवसांची रोपे लावणीसाठी वापरावीत.
* पुनर्लागवडीनंतर पहिल्या ३० दिवसांपर्यंत शेतात पाण्याची पातळी २.५ ते ५ सेंमी ठेवावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* जमिनीच्या मगदुराप्रमाणे १५x१५ किंवा २०x१५ सेंमी अंतरावर लावणी करावी.
* भात पिकास चिखलणीच्या वेळी प्रति हेक्टरी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे.
* डोंगर उतारावरून भात खाचरांमध्ये तीव्र वेगाने पाणी येत असल्यास ते पाणी इतरत्र वळवण्याची व्यवस्था करावी.
* सुरळीतील अळी: या किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून, नियंत्रणासाठी शेतात पाणी बांधून ठेवावे, किडग्रस्त पिकावरून जाड दोर ओढून सुरळ्या पाण्यात पाडाव्यात आणि नंतर पाणी काढून सुरळ्या नष्ट कराव्यात.
* निळे भुंगेरे: या किडीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के २००० मि.ली. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रिन ५ टक्के २५० मि.ली. प्रति ५०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
* खेकडे नियंत्रण: पावसाच्या सुरुवातीला सलग २ ते ३ रात्री बत्तीच्या उजेडात खेकडे पकडून संख्या कमी करावी. त्यानंतर विषारी अमिषाचा वापर करावा (१ किलो शिजलेल्या भातात ५० ग्रॅम गूळ + ७५% पाण्यात विरघळणारी ऍसीफेट पावडर ७५ ग्रॅम).
* नागली, वरी:
* रोपे लावणीस तयार झाल्यानंतर रोपवाटिकेतील वाफ्यांना भरपूर पाणी द्यावे.
* ३० दिवसांची रोपे एका ठोंब्यात दोन याप्रमाणे दोन ओळीत २० सेंमी आणि दोन रोपात १५ सेंमी अंतर ठेवून लावावीत.
* प्रति हेक्टरी ८० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावे.
* रोपवाटिकेत साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.
* नारळ:
* कोंब कुजणे: वाढलेल्या आर्द्रतेमुळे या रोगाचा प्रादुर्भाव दिसण्याची शक्यता आहे. कुजलेला कोंब साफ करून त्यामध्ये १ टक्के बोर्डोमिश्रण ओतावे.
* ड्ररीयोफाईड कोळी: नियंत्रणासाठी निंबोळी पेंड ५ किलो प्रति झाड द्यावे.
* बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करावा.
* आंबा:
* पॅक्लोब्युट्रॉझॉल: नियमित फळधारणेसाठी १५ जुलै ते ३१ ऑगस्ट दरम्यान पूर्ण वाढलेल्या झाडाला (१० वर्षांवरील) पॅक्लोब्युट्रॉझॉल द्यावे. झाडाच्या आकारमानानुसार प्रति मीटर व्यासास ०.७५ ग्रॅम पॅक्लोब्युट्रॉझॉल द्यावे.
* फांदेमर: आर्द्र व ढगाळ वातावरणामुळे या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड ०.३ टक्के किंवा ०.१ टक्के बोर्डो मिश्रण फवारणी करावी.
* बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करावा.
* काजू:
* फांदेमर: आर्द्र व ढगाळ वातावरणामुळे या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसण्याची शक्यता आहे. नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सीक्लोराइड ०.३ टक्के किंवा ०.१ टक्के बोर्डो मिश्रण फवारणी करावी.
* बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करावा.
* सुपारी:
* कोळेरोग: वाढलेल्या आर्द्रतेमुळे या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसण्याची शक्यता आहे. रोगट शिंपुटे, वाळलेल्या झावळ्या नष्ट कराव्यात व पानांच्या बेचक्यात १% बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी.
* बागेत अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करावा.
* हळद:
* नत्र खताची मात्रा: लागवडीनंतर दीड महिन्यांनी ८५० ग्रॅम युरिया प्रति गुंठा पावसाची तीव्रता कमी असताना द्यावा.
* कंद माशी: नियंत्रणासाठी प्लास्टिकच्या बरणीत सुकी मासळी ओलसर करून शेतात ४ ते ५ ठिकाणी ४ ते ५ फुट उंचीवर ठेवावी.
* पिकात अतिरिक्त पाणी साचले असल्यास त्याचा निचरा करावा.
* वेलवर्गीय भाजीपाला (पडवळ, कारली, दुधी भोपळा, शिराळी):
* वेल टाकू लागल्यावर त्यांना शिऱ्या लावून आधार द्यावा आणि मंडपाची व्यवस्था करावी.
* नत्र खताची दुसरी मात्रा प्रती वेल १० ग्रॅम युरिया याप्रमाणात लागवडीनंतर एक महिन्यांनी द्यावी.
* तांबडे भुंगे, तुडतुडे, मावा: नियंत्रणासाठी डायमिथोएट १५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था करावी.
कुक्कुटपालन:
* ब्रॉयलर पक्ष्यांना पहिले तीन आठवडे त्यांच्या वजनानुसार ब्रॉयलर स्टार्टर व पुढे विक्री होईपर्यंत ब्रॉयलर फिनिशर खाद्य द्यावे.
* मांसेतील कोलेस्ट्रोलचे प्रमाण कमी करण्यासाठी व अधिक वाढीसाठी खाद्याच्या १.५% काळे जिरे पावडर किंवा ०.५% हळद पावडर किंवा १% आले भुकटी द्यावी.
* किमान ७० टक्के पिल्लांना खाद्य खाता येईल एवढी भांडी ठेवावीत.
* पाण्यासाठी ५ लिटरचे एक भांडे प्रति ५० पक्षी यानुसार ठेवावे. पिल्लांना किमान ३ वेळा ताजे व स्वच्छ पाणी द्यावे.
अधिक माहितीसाठी शेतकरी नजीकच्या कृषी विद्यापीठाचे केंद्र, कृषी विज्ञान केंद्र किंवा महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधू शकतात.