अनिल परब यांच्यावर जोरदार टीका
खेड । राकेश कोळी :
शिवसेना नेते रामदास कदम यांनी सावली बार प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत अनिल परब यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. पत्रकार परिषदेत त्यांनी कराराचे दस्तऐवज सादर करून सांगितले की, हॉटेल शरद शेट्टी यांना चालवायला दिले होते आणि नियमभंग झाल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात आली.
कदम यांनी सांगितले की, कराराच्या अटींनुसार कोणताही बेकायदेशीर धंदा चालवता येणार नाही आणि गैरप्रकार झाल्यास जबाबदारी चालवणाऱ्यावरच राहील. त्यामुळे मालकावर दोष येत नाही. त्यांनी सांगितले की, आम्ही 13 जुलै रोजी दोन्ही लायसन्स पोलिसांकडे जमा केले, मात्र अनिल परब यांनी 18 जुलै रोजी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. हे सर्व हेतुपुरस्सर बदनामीसाठीच करण्यात आले.
रामदास कदम यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणाचा त्यांच्या मुलाशी किंवा गृहराज्यमंत्री पदाशी काहीही संबंध नाही. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांनी याप्रकरणी सभापतींकडे तक्रार दिली असून, आरोप मागे घेण्याची मागणी केली आहे.
वाशीमध्ये योगेश कदम यांनी एका लेडिज बारवर केलेल्या कारवाईमुळेच काही पोलीस अधिकारी त्यांच्यावर दबाव टाकत होते आणि बदनामीचे कारस्थान घडवून आणले, असा आरोपही रामदास कदम यांनी केला. या संपूर्ण प्रकाराची चौकशी होण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्याचेही सांगितले.
मनसेने राज्यात लेडिज बारवर केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले आणि महाराष्ट्रातील सर्व अशा बारवर बंदी घालण्याची गरज व्यक्त केली.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर टिप्पणी करत कदम म्हणाले की, त्यांचा धर्मावर चांगला अभ्यास आहे, त्यामुळे त्यांनी धर्मगुरू व्हावे. तर संजय शिरसाट यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना, सरकारचा एक-एक पैसा जनतेसाठी वापरला गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
रामदास कदम यांनी अनिल परब यांना इशारा देत सांगितले की, मी सर्व पत्ते उघड करणार नाही, पण आमच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणारच. कोणीही वाचणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.











