लव्ह जिहाद प्रकरणी पुलाची शिरोली आज कडकडीत बंद…

आरोपी ताब्यात पण साथीदार फरार…

प्रतिनिधी/ रोहन कांबळे

कोल्हापूर: हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे कथित लव जिहाद प्रकरण उघडकिस आले.प्रकरण उघडकिस आल्यानंतर गावात संतापाची लाट उसळी असून मंगळवारी गाव बंद ठेवण्यात आला. या प्रकरणात समीर सनदे याला पोलिसांनी अटक केली असून त्याचा साथीदार शाहरुख देसाई हा अद्याप फरार आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपीकडे काही युवतींचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो असल्याची बाब समोर आली आहे. संबंधित प्रकरणात अधिक तपास सुरू असून नेमकी संख्या आणि स्वरूपाबाबत अधिकृत पुष्टी होणे बाकी आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी समीर सनदे याचे एका युतीसोबत प्रेम संबंध होते. त्याचा गैरफायदा घेत इतर मुलींनाही जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे. तसेच संबंधित युवतींना व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची सांगितले जात आहे.या प्रकरणाची माहिती बाहेर आल्यानंतर गावात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

हिंदुत्ववादी संघटनांनी गाव बंदची हाक दिल्यानंतर मोठ्या संख्येने कार्यकर्ते शिरोली फाटा परिसरात जमले. आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत चौकाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना रोखले.यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये किरकोळ झटापट झाल्याची माहिती आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

ग्रामपंचायतकडून संबंधित आरोपीचे विज व पाणी बिल तोडण्याचा निर्णय घेतला त्याची माहिती देण्यात आली. आमदार अशोक माने, संजय पवार व विजय देवणे यांनीही घटनास्थळी भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली.

सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांना आरोपींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले.दरम्यान दिवसभर शिरोली परिसरात तणावपूर्ण शांतता होती.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलीस उपाधीक्षक सूजित क्षीरसागर, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह कृती दल दंगल काबू पथक आणि मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. फरार आरोपीला शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथके कार्यरत आहेत.