लांजा कुवे बचाव समितीची मागणी, अधिकाऱ्यांना निवेदन
लांजा-: संतोष कोत्रे
कार्यालयात बसून तयार केलेला आणि प्रचंड त्रुटी असल्याने लोकांच्या घरादारांवर नांगर फिरवणाऱ्या लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्याला स्थगिती मिळावी, अशी मागणी लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन आज सोमवारी ४ ऑगस्ट रोजी नगर रचना विभागाचे सेवावृत्त सहायक संचालक तथा विकास आराखडा योजना समितीचे सदस्य मिलिंद आवडे त्यांना देण्यात आले.
लांजा शहराच्या प्रारूप विकास आराखड्या वरून (डीपी) सध्या लांजा आणि कुवे येथील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. टंडन कंपनीने कार्यालयात बसून, जागेवर न जाता हा आराखडा तयार केलेला असल्याने या विकास आराखड्यात प्रचंड प्रमाणात त्रुटी असून यामध्ये लोकांची घरे, गोठे बाधित होणार आहेत. या विकास आराखड्या संदर्भात आज सोमवार पासून लोकांनी दाखल केलेल्या हरकतींवर सुनावणी सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर आज लांजा कुवे बचाव समितीच्या वतीने नगर रचना विभागाचे सेवावृत्त सहायक संचालक तथा विकास आराखडा योजना समितीचे सदस्य मिलिंद आवडे यांना निवेदन सादर करण्यात आले.अशाप्रकारे शेकडो त्रुटी असलेल्या या विकास आराखड्याला तातडीने स्थगिती मिळावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना लांजा कुवे बचाव समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेकर,पदाधिकारी दिलीप मुजावर ,विजय कुरूप, परवेश घारे, प्रमोद कुरूप, नितीन शेट्ये ,राजेश राणे, सचिन लिंगायत, विठोबा लांजेकर, जयवंत शेट्ये ,मयूर शेडे आदींसह अन्य नागरिक उपस्थित होते.













