वरिष्ठ अधिकारी तसेच भाजपा व शिवसेना पदाधिकारी यांनी सरपंचांची बाजू घेतली जाणून
महिन्याभरात सर्व कार्यवाही होईल : प्रशासनाचे लेखी पत्र
मालवण | प्रतिनिधी : पंचायत समिती प्रशासनातील काही अधिकाऱ्यांकडून मिळत असलेल्या असहकार्याबद्दल थेट सरपंच संघटनेच्यावतीने मालवण पंचायत समितीमध्ये ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. दरम्यान सरपंच संघटनेच्या समस्या जाणून घेण्यासाठी भाजप आणि शिवसेना पदाधिकारी यांनी भेट देत चर्चा केली. दरम्यान, सरपंचांचे प्रश्न समस्या यावर चर्चा करून पंचायत समितीकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. पत्र व्यवहार, काही मागण्या यावर महिनाभरात निर्णय घेतले जातील. असे लेखी पत्र प्रशासनाने दिल्यानंतर सरपंच संघटनेने ठिय्या आंदोलन मागे घेतले. मात्र एका महिन्यात कार्यवाही न झाल्यास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन छेडू असा इशारा सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस, तालुकाध्यक्ष व्ही. बी. साटम यांनी यावेळी दिला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिप अध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वास गांवकर, शहरप्रमुख दिपक पाटकर, माजी उपसभापती राजू परुळेकर, महेश मांजरेकर, अरुण तोडणकर यांनीही सरपंच संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
पालकमंत्री नितेश राणे यांनी सरपंच संघटना अध्यक्ष यांना संपर्क साधून सरपंच यांच्या समस्येसंदर्भात लवकरच एक बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. तर आमदार नीलेश राणे यांनीही माहिती घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांना सरपंच संघटनेची भेट घेऊन चर्चा करण्याची सूचना केली. त्यानुसार दत्ता सामंत यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. समस्या जाणून आमदार नीलेश राणे यांच्याकडे सरपंचांची भूमीका मांडण्यासाठी एक बैठक अधिकारी आणि आमदार यांच्या उपस्थितीत लावण्यात येईल असे आश्वासन दिले. दत्ता सामंत यांनी आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनात अभ्यासपूर्णपणे प्रशासनासोबत चर्चा करतं सरपंच यांची भुमिका ठामपणे मांडली.
एक महिन्यात पंचायत समिती स्तरावरून सरपंच यांच्या समस्यांबाबत निर्णय घेण्यात येईल. कार्यवाही होईल. असे लेखी पत्र देत दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शामसुंदर वाक्कर, सरपंच पी. के. चौकेकर, शुभम मठकर, सीया धुरी, निलीमा परूळेकर, सुनील खवणेकर, भगवान लुडबे, विजय नेमळेकर, प्रकाश तोंडवळकर, लता खोत, रंजना पडवळ, प्रतिक्षा हळदणकर, धंनजय परब, अजीत राणे, अक्षय तावडे, रविंद्र साळकर, प्रतिक्षा पांचाळ, विशाखा सकपाळ, विशाखा काळसेकर, अमोल वस्त, दिव्या धुरी, शलाका रावले, रश्मी टेंबुलकर, शेखर पेणकर, धोंडी कामतेकर, मनमोहन डिचोलकर, मृणाली मयेकर, रेश्मा गावडे, सुबोधिनी परब तसेच इतर पदाधिकारी व सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.
तालुका सरपंच संघटनेच्यावतीने तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या समस्यांसदर्भात पंचायत समिती प्रशासनाकडे अनेकदा निवेदन अगर प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या मांडल्या होत्या. मात्र प्रशासनातील काही अधिकारी यांच्याकडून या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आज थेट संघटनेने ठिय्या आंदोलन छेडले. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण हे प्रशिक्षणासाठी बाहेर असल्याने ते उपस्थित नव्हते. सरपंच संघटनेच्या प्रतिनिधींशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चर्चा केली.
सरपंच यांच्यावर प्रशासनातील अनियमीतेबद्दल कारवाई केली जात असते. मात्र प्रशासकीय कामाबद्दल सरपंच व ग्रामसेवक हे दोघेही बरोबरीने जबाबदार असताना फक्त सरपंच यांनाच दोषी ठरविण्याचे काम ग्रामपंचायत विभागाकडून केले जात आहे. यामुळे तालुक्यातील अनेक सरपंचांना नाहकपणे अडचणीत आणण्यात आले आहे. अनेक ठिकाणी सरपंच यांना ग्रामसेवक सहकार्य करत नसल्याने विकासकामे ठप्प झाली आहेत. सरपंचांनी ग्रामसेवकांबद्दल अगर काही अधिकाऱ्यांबद्दल हरकत नोंदविली की त्यांना थेट प्रशासकीय कारवाईत अडकविण्याचेही प्रताप याठिकाणी करण्यात आले आहेत. सरपंचांना नाहकपणे त्रास देण्याचे काम करण्यात येत असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. काही ग्रामसेवक यांच्याकडे दोन किंवा तीन गावांचा पदभार देण्यात आला आहे. तर काही ग्रामसेवक फक्त एकाच गावात कार्यरत आहेत. पदभार असलेले ग्रामसेवक महिन्यातून काहीच दिवस ग्रामपंचायतीमध्ये दिसून येत आहेत. सुमारे चाळीत ते पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या गावांमध्ये त्यांची नियुक्त असल्याने त्यांना ये जा करणे अडचणीचे ठरत आहेत.
बचतगट संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही करण्यात येत नाही. गावातील बचतगटाचे प्रतिनिधी यांच्याकडे काही विचारणा केली तर ते आमचे अधिकारी आम्हाला सांगतील तशाप्रकारे आम्ही काम करणार असे सांगतात, गावातील सरपंचांना कोणतीही माहिती देण्यात येत नाही, अशाप्रकारे उपस्थित सरपंचांनी आपल्या तक्रारी केल्या.
गावातील अंगणवाड्यांतील जातीवाचक नावे रद्द करण्याचा आदेश काढलेला असतानाही पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागाकडून त्याबाबत कार्यवाही केली जात नाही. ग्रामसेवकांकडून पंचायत समितीकडे तर पंचायत समितीकडून ग्रामसेवक यांच्याकडे चेंडू टोलविला जात आहे. याबाबत पालकमंत्री यांनीही आदेश दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार कार्यवाही झालीच पाहिजे असे चौके सरपंच पी. के. चौकेकर यांनी सांगत श्री. पाटील यांचे लक्ष वेधले. अधिकारी यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश पंचायत समिती प्रशासनाला दिले आहेत.












