सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील गेळे, चौकुळ आणि आंबोली या तीन गावांच्या जमिनीच्या प्रश्नावर लवकरच सुनावणी घेतली जाईल आणि हा प्रश्न मार्गी लावला जाईल, अशी माहिती माजी शालेय शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली. महसूल सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी महसूल विभागातील विविध लोकोपयोगी योजनांचा शुभारंभ केला आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सत्कार केला.
‘महाराज स्व-समाधान अभियान’ आणि जुने सातबारा वितरणाचा शुभारंभ
आमदार केसरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सुरू झालेल्या ‘महाराज स्व-समाधान अभियान’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यासोबतच जुने सातबारा उतारे थेट गावात वितरीत करण्याच्या योजनेचाही प्रारंभ झाला. केसरकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक केले आणि महसूल विभागात आता जनतेच्या हिताची कामे होत असल्याचे नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावंतवाडीच्या तहसीलदारांचा सन्मान
कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. कोकण विभागात उत्कृष्ट तहसीलदार म्हणून त्यांना तीन पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार केसरकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, आदर्श कर्मचारी म्हणून पूनम नाईक, गंगाराम सोनू शेळके, रणशूर आणि पोलीस पाटील तानाजी सावंत यांचाही सत्कार करण्यात आला.
विकासकामांसाठी निधीची घोषणा
आमदार केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात येत्या दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प सुरू होतील असा विश्वास व्यक्त केला. खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या सहकार्याने पर्यटन क्षेत्रालाही चालना मिळेल असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी अनेक विकासकामांसाठी निधीची घोषणा केली:
* तहसीलदार कार्यालय छप्पर: ९८ लाख रुपये मंजूर आणि काम पूर्ण झाले.
* तलाठी व मंडळ कार्यालये: ७ नवीन कार्यालयांना मंजुरी.
* जनरेटरसाठी: आमदार निधीतून ५० लाख रुपये दिले जातील.
* वाहन पार्किंग आणि पायाभूत सुविधा: तहसीलदार कार्यालयासाठी २५ लाख रुपये मंजूर.
‘महाराज स्व-समाधान अभियान’ची उद्दिष्ट्ये
तहसीलदार श्रीधर पाटील यांनी ‘महाराज स्व-समाधान अभियान’ या उपक्रमाची माहिती दिली. या अभियानांतर्गत जुने सातबारा उतारे थेट गावातील तलाठी कार्यालयात उपलब्ध करून दिले जातील. तसेच, वैद्यकीय दाखलेही जलदगतीने दिले जाणार आहेत. या योजनेमुळे नागरिकांना कार्यालयात फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. आतापर्यंत संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १२६६ प्रकरणे मंजूर झाली असून, ४०२ नवीन शिधापत्रिकांचे वाटप आणि ५४९१ दाखले वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख ॲड नीता सावंत कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.












