महामार्ग सुरक्षा बैठकीत गॅस टँकर अपघातांवर कठोर उपाययोजनांवर चर्चा
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हातखंबा व निवळी येथे घडलेल्या एलपीजी गॅस टँकरच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी, श्री. नितीन बगाटे यांनी ४ ऑगस्ट, २०२५ रोजी “महामार्ग सुरक्षा बैठक” आयोजित केली होती. या बैठकीत, वारंवार होणाऱ्या गॅस टँकर अपघातांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी, बैठकीत खालील कठोर सूचना देण्यात आल्या आहेत.
गॅस टँकर चालकांसाठी कठोर नियम:
* चालकांची वेळोवेळी वैद्यकीय तपासणी आणि शारीरिक चाचणी करणे बंधनकारक आहे.
* मद्यपान करून किंवा मोबाईलचा वापर करून गॅस टँकर चालवण्यास सक्त मनाई आहे.
* चालकांना सुरक्षित वाहतुकीचे विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.
* टँकरचा ताफा कमाल २० किमी प्रतितास वेगाने आणि एस्कॉर्टसह सुरक्षित अंतरावर असावा.
* प्रत्येक चालकासोबत एक सहाय्यक चालक असणे अनिवार्य आहे.
* चालकांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी आवश्यक क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावे.
तांत्रिक आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा:
* गॅस टँकरच्या व्हॉल्व्ह आणि फ्रेम डिझाइनमध्ये सुरक्षितता आणि उपयुक्तता वाढवण्यासाठी योग्य बदल करण्यात यावे.
* हातखंबा येथे तात्काळ बचाव वाहन उपलब्ध करून ठेवण्यात यावे.
* बचाव पथकाला योग्य आणि विशेष प्रशिक्षण देण्यात यावे.
या बैठकीत संबंधित सर्व विभागांचे अधिकारी, गॅस कंपन्यांचे प्रतिनिधी, रस्त्याचे कंत्राटदार, एनएचएआय (NHAI), आरटीओ (RTO), तसेच जेएसडब्ल्यू (JSW) जयगड, ईगल इन्फ्रा लिमिटेड, ब्लूम कंपनी, कॉन्फिडंस पेट्रोलियम, जेएसडब्ल्यू जेपीएल आणि जेएसडब्ल्यू जयगड पोर्टचे प्रकल्प व्यवस्थापक उपस्थित होते.
एनएचएआय आणि आरटीओसाठी कठोर निर्देश:
एनएचएआय आणि आरटीओ अधिकाऱ्यांसाठी खालील निर्देश देण्यात आले आहेत:
* रस्त्यांवर योग्य ठिकाणी सुरक्षा चिन्हे व सूचना फलक तातडीने लावण्यात यावे.
* रस्त्यांची बांधणी (डांबरीकरण) जलद गतीने पूर्ण करावी.
* महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी स्पीड ब्रेकरचा वापर करावा.
* गॅस टँकरची अचानक तपासणी करून ओव्हरलोडिंग, तसेच मद्यपान करून गाडी चालवताना आढळणाऱ्या चालकांवर कठोरत-कठोर कारवाई करावी.









