ओटवणे (प्रतिनिधी ) मुंबई स्थित ओटवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई चा वार्षिक पारितोषिक आणि गुणगौरव सोहळा बोरिवली पूर्व देवीपाडा येथील शिवशक्ती विकास मंडळाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाला.ओटवणे गावच्या सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मंडळाच्या या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम प्रसंगी व्यासपिठावर प्रमुख पाहूणे म्हणून महादेव परब, मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत, कार्याध्यक्ष गणपत गांवकर, सरचिटणीस रामचंद्र गावकर, उपाध्यक्ष नितीन सावंत, खजिनदार गुरुनाथ गावडे, गंगाराम बिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी या कार्यक्रमात मंडळातील सदस्याने त्यांच्या कुटुंबियांनी वर्षभरात विविध क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला जातो त्याच बरोबर जेष्ठ चाकरमानी ग्रामस्थ म्हणूनही सन्मान केला जातो या वर्षी श्रीम सिता रामचंद्र भाईप यांची निवड करून सन्मान करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांच्याहस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दरवर्षी प्रमाणे निवड केलेल्या जेष्ठ ग्रामस्थ स्मिता भाईप यांना छत्री अर्जुन उर्फ तात्या गांवकर यांनी भेट म्हणून दिली.
दहावी, बारावी आणि पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या रिद्धी मंगेश धुरी, नेहा यशवंत नाईक, आर्यन उमेश गावकर, शुभम शंकर नाईक या चाकरमान्यांच्या मुलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यक्त होताना सिता भाईप यांनी जेष्ठ ग्रामस्थ म्हणून आपला सन्मान केल्याबद्दल मंडळाचे आभार मानले.व सर्व मुंबई स्थित ओटवणे ग्रामस्थानी संघटित होत एकसंघ राहून मंडळाच्या उत्कर्षांस हातभार लावावा असे आवाहन केले. यावेळी गणपत गावकर, प्रा नितीन सावंत, गोपाळकृष्ण सावंत, उमेश गावकर, आनंदा जाधव, यशवंत नाईक यांनी आपले मनोगत व्यक्त केले
यावेळी मंगेश धुरी, महेंद्र गावकर, विलास तावडे, सहदेव गावकर, महेश मालजी, शिवराम गावकर अशोक माटेकर, कमलाकर गावकर, दत्तात्रय गावकर, सचिन माटेकर, शंकर नाईक, इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी, सुत्रसंचालन मंडळाचे सरचिटणीस रामचंद्र गांवकर यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष गणपत गांवकर यांनी मानलेत.











