रत्नागिरी :
राज्यात प्रतिबंधित असलेल्या आणि फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चिपळूण, रत्नागिरी येथील राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकांनी 5 ऑगस्ट 2025 रोजी केली.
ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे वालोपे गावातील तांबीटकरवाडी येथे करण्यात आली. मोहन लक्ष्मण तांबीटकर यांच्या घराजवळील एका खोलीत हा बेकायदेशीर साठा लपवून ठेवला होता. जप्त केलेल्या मालामध्ये 63 बॉक्स होते, ज्यांची एकूण किंमत रु 5,67,840 (पाच लाख सदुसष्ट हजार आठशे चाळीस रुपये) आहे. या साठ्याचे प्रमाण 556.92 बल्क लिटर होते.
या प्रकरणात, प्रवीण गणपत तांबीटकर, रा. वालोपे, तांबीटकरवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी याच्या ताब्यातून हा माल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या कलम 65 (ई) आणि 90 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुनील आरडेकर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, चिपळूण, जि. रत्नागिरी हे करत आहेत.
ही कारवाई आयुक्त डॉ. श्री. राजेश देशमुख, सह आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, आणि अधीक्षक श्रीमती कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये निरीक्षक सुनील आरडेकर, जवान शुभम काडापुरे, जवान निखिल लोंढे, जवान मयूर पुरीबुवा आणि जवान-सह-वाहनचालक विशाल विचारे यांचा समावेश होता.
जिल्ह्यात कुठेही हातभट्टीची दारू, बनावट माडी, किंवा परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व साठा आढळल्यास, नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांक 8422001133 किंवा टोल-फ्री क्रमांक 18002339999 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवले जाईल.













