कविता म्हणजे कवीच्या मनातील भावना आणि विचारांची अभिव्यक्ती : कवी दीपक पटेकर

कै. प्रा. उदय खानोलकर वाचन मंदिर, मळगाव येथे “काव्यांजली” कार्यक्रम उत्साहात 

सावंतवाडी । प्रतिनिधी : कविता म्हणजे कवीच्या मनातील भावना आणि विचारांची अभिव्यक्ती असते. कविता अंतरीतून स्फुरते आणि म्हणूनच ती श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करते, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष कवी दीपक पटेकर यांनी केले.

कै. प्रा. उदय खानोलकर वाचन मंदिर, मळगावच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून मंगळवार, ५ ऑगस्ट रोजी “काव्यांजली” हा अनोखा कविता वाचन आणि गायनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महेश खानोलकर होते, तर माजी पोलीस उपअधीक्षक दयानंद गवस, मळगाव इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष मनोहर राऊळ, आणि वाचन मंदिराचे उपाध्यक्ष बाबली नार्वेकर यांच्यासारख्या मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

याप्रसंगी, महेश खानोलकर यांनी वाचनालयाच्या २५ वर्षांच्या प्रवासाची माहिती दिली. कोरोनानंतर कमी झालेल्या वाचक संख्येबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि मुलांना पुन्हा वाचनालयाकडे येण्याचे आवाहन केले.

*मळगाव इंग्लिश स्कूलच्या बालकांनी उधळले काव्यरंग*

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते मळगाव इंग्लिश स्कूलच्या पाचवी ते दहावीच्या मुला-मुलींनी सादर केलेल्या स्वरचित कविता. निसर्ग, पाऊस, श्रावणसरी, देशप्रेम, आई, सैनिक अशा विविध विषयांवर रचलेल्या कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.

कवी दीपक पटेकर यांनी या बालकवींच्या प्रतिभेची आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाची प्रशंसा केली. शाळेच्या शिक्षिका प्रज्ञा मातोंडकर, ऋतुजा सावंत भोसले, रितेश राऊळ यांनीही आपापल्या कविता सादर केल्या. दोडामार्गहून आलेले कवी रामचंद्र शिरोडकर यांनी सादर केलेल्या मालवणी कवितांनी कार्यक्रमात रंगत भरली.

*कवितेचे मर्म उलगडले कवी दीपक पटेकर यांनी*

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात, कवी दीपक पटेकर यांनी बालकवींना कविता लिहिण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. कविता कशी लिहावी, कवितेत लय, ताल, यमक आणि सोप्या शब्दांचा वापर का महत्त्वाचा आहे, याबद्दल त्यांनी सविस्तर विवेचन केले. शब्दांचे भांडार वाढवण्यासाठी इतर कवींच्या कविता वाचण्याचा सल्ला देत, त्यांनी “वाचाल तर वाचाल” या डॉ. बाबासाहेबांच्या वाक्याची आठवण करून दिली.

ज्ञानसेवेची २४ वर्षे पूर्ण करून २५ व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांनी कै. प्रा. उदय खानोलकर वाचन मंदिराच्या कार्याचे कौतुक केले.

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

याच कार्यक्रमात मळगाव इंग्लिश स्कूलमधून दहावीत पहिल्या चार क्रमांकात आलेल्या निधी राऊळ, चैताली राऊळ, याहीका साटेलकर आणि जान्हवी अमरे यांचा गौरव करण्यात आला.

त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून इतिहास विषयात सुवर्णपदक मिळवलेल्या प्रसन्न सोनुर्लेकर याचाही ग्रंथभेट देऊन सन्मान करण्यात आला. या वाचन मंदिरामुळेच आपण या स्तरावर पोहोचल्याचे प्रसन्नने अभिमानाने सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. स्नेहा खानोलकर यांनी केले, तर चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी मळगाव इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक फाले सर, पालक आणि वाचनालयाचे अनेक वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.