‘हर घर तिरंगा’ अभियान जिल्हा संयोजक संदीप गावडेंची संकल्पना; देशभक्ती आणि फिटनेसचा दिला जाणार संदेश
सावंतवाडी: ‘हर घर तिरंगा’ अभियानाचा एक भाग म्हणून, देशभक्ती आणि फिटनेसचा संदेश देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा भाजपने सावंतवाडी येथे ‘तिरंगा दौड’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. भाजपचे जिल्हा संयोजक संदीप गावडे यांच्या संकल्पनेतून आणि महेंद्र अकॅडमीच्या सहकार्याने ही स्पर्धा १४ ऑगस्ट रोजी सकाळी ६:१५ वाजता शिवराम राजे भोसले उद्यानातून सुरू होऊन त्याच ठिकाणी समाप्त होईल.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करणे आणि नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढवणे हा आहे. ही दौड सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली आहे. यामध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र गट आहेत. सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र, मेडल आणि खास टी-शर्ट दिले जाईल.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. पुरुष गटासाठी प्रथम पारितोषिक १० हजार रुपये, द्वितीय ७ हजार रुपये आणि तृतीय ५ हजार रुपये आहे. १४ वर्षांखालील मुलांसाठी ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये अशी बक्षिसे आहेत. महिला गटातील विजेत्यांना ५ हजार, ३ हजार आणि २ हजार रुपये दिले जातील, तर लहान मुलींसाठी ३ हजार, २ हजार आणि १ हजार रुपये अशी बक्षिसे आहेत.
आयोजकांनी सर्व स्पर्धकांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, जास्तीत जास्त नागरिकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया लवकरच सुरू होईल. अधिक माहितीसाठी इच्छुक स्पर्धक महेंद्र सर (९०२२६८ ६९४४) आणि आविष्कार सर (७२१९०९६८१३) यांच्याशी संपर्क साधू शकतात.











