बांदा । प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ बांदा आणि रोटरॅक्ट रायझिंग युथ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आंतरराष्ट्रीय रेटेड खेळाडू बाळकृष्ण पेडणेकर याने विजेतेपद पटकावले आहे. या विजयामुळे बाळकृष्णचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
जिल्हा परिषद शाळा क्र. १ च्या सभागृहात ही स्पर्धा पार पडली. १६ वर्षांवरील आणि १६ वर्षांखालील अशा दोन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील एकूण २८ खेळाडूंनी यात सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या स्पर्धेत सावंतवाडी येथील बाळकृष्ण पेडणेकर याने १६ वर्षांवरील गटातून ५ पैकी ५ सामने जिंकून निर्विवाद विजेतेपद मिळवले.
यावेळी बाळकृष्णला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून रोख रक्कम, आकर्षक चषक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी रोटरी क्लब ऑफ सावंतवाडीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचाही तो विजेता होता.
स्पर्धेचे उद्घाटन बांदा उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर, रोटरी अध्यक्ष शिवानंद भिडे, सचिव स्वप्नील धामापूरकर, रोटरॅक्ट अध्यक्ष रोहन कुबडे, सचिव डॉ. मिताली सावंत, मुख्याध्यापक असनकर, रोटरी सदस्य यशवंत आळवे, संकेत वेंगुर्लेकर, विराज परब, तसेच रोटरॅक्ट सदस्य मनीषा खणगावकर, शिवम गावडे, नेहा निगुडकर यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल बाळकृष्णचे वडील आणि मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी समाधान व्यक्त केले. रोटरी क्लब आणि रोटरॅक्ट यांच्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील बुद्धिबळ खेळाडूंना एक उत्तम व्यासपीठ मिळाले आहे, असे त्यांनी सांगितले. बाळकृष्णच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.











