‘उत्सव विचारांचा’ वक्तृत्व स्पर्धेला तरुणांचा उदंड प्रतिसाद

 

 

‘मेरा युवा भारत सिंधुदुर्ग’ आणि ‘पब्लिक रिलेशन फाउंडेशन सिंधुदुर्ग’ तर्फे आयोजन

सावंतवाडी: स्वातंत्र्य दिनानिमित्त ‘मेरा युवा भारत सिंधुदुर्ग’ आणि ‘पब्लिक रिलेशन फाउंडेशन सिंधुदुर्ग’ यांच्या संयुक्त विद्यमाने, ‘उत्सव विचारांचा’ या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात झालेल्या या स्पर्धेत, तरुणांनी ज्वलंत सामाजिक विषयांवर आपले विचार मांडून उपस्थितांची मनं जिंकली. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहायक गजानन नाटेकर, शिवसेना ओबीसी तालुकाध्यक्ष वासुदेव होडावडेकर, नायब तहसीलदार सविता तारी, उर्मिला गावडे, सावली फाउंडेशनच्या अध्यक्ष सावली पाटकर, मेरा युवा भारत सिंधुदुर्गचे जयराम जाधव आणि पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या सचिव फिजा मकानदार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. त्यानंतर, पब्लिक रिलेशन फाउंडेशनच्या सचिव फिजा मकानदार यांनी प्रास्ताविक सादर केलं. त्यांनी तरुणांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन केल्याचं सांगितलं.

प्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितलं की, भारतीय तरुणांनी जगाला क्रांतीचा इतिहास दिला आहे आणि त्यांच्यामध्ये जगाला प्रेरणा देण्याची क्षमता आहे. उपस्थितांना नायब तहसीलदार सविता तारी यांनीही शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेत ‘आजच्या युवकांसमोरील आव्हाने’, ‘आजच्या भारतात स्त्री खरंच सुरक्षित आहे का?’, ‘हेवा कोकण आपलोच असा पण तो कोकण टिकवण्यासाठी आमची जबाबदारी काय?’ आणि ‘कधी मिळेल का कोकणातल्या तरुणाला त्याच्या कोकणातल्या मातीत रोजगार…’ यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर स्पर्धकांनी आपले विचार प्रभावीपणे मांडले.

या स्पर्धेत सिद्धी शशिकांत सावंतने प्रथम, मंदार दुर्गाराम जोशीने द्वितीय आणि विठ्ठल संजय दळवीने तृतीय क्रमांक पटकावला. त्याचबरोबर, उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक वीणा वामन गावडे आणि उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक प्राची गोविंद सावंतने मिळवला. समीन नाईक आणि नारायण परब यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

तर स्पर्धेत अंकिता पाटील, दिपाली राऊळ, प्रणिता गवळी, वीणा गावडे, प्राची सावंत, विठ्ठल दळवी, भाविका कदम, वैभवी हानपोड, मंदार जोशी, सिद्धी सावंत, सादिया भाऊदिन, सुनिधी मराठे आणि ज्ञानेश्वर गवळी या स्पर्धकांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कामाक्षी महालकरने केलं आणि श्रुती सावंतने आभार मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पब्लिक रिलेशन फाउंडेशनचे नासिर मकानदार, श्रुती सावंत, फातिमा मकानदार, ललित हरमलकर, मिताली राऊळ, राकेश जाधव, प्राजक्ता सांगेलकर, विनायक सांगेलकर, तेजस धोंड यांनी विशेष सहकार्य केलं.