रत्नागिरी, दि. १२ स्वामित्व गावठाण भूमापन योजनेंतर्गत जिल्ह्यातील मंडणगड आणि रत्नागिरी तालुक्यातील गावकऱ्यांना सनद वाटप करण्यात आले आहे.
मंडणगड तालुक्यात उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयामार्फत जुलै २०२५ मध्ये मौजे लोकरवन, उमरोली, राजवली, जावळे, आसावळे, तुळशी, कळकवणे, धामणी आणि गुढेघर या गावांमध्ये एकूण ५६० सनद वाटप करण्यात आली असून, सनद शुल्क म्हणून २ लाख ५८ हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे.
रत्नागिरी तालुक्यात उपअधीक्षक, भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मौजे पानवल आणि रनपार या गावांमध्ये एकूण १०६ सनद वाटप करण्यात येऊन १ लाख १० हजार ९७५ रुपये सनद शुल्क वसूल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी इतर तालुक्यांमध्येही या योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. सिंह आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख एस. एस. इंगळी यांनी केले आहे.












