मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्णांसाठी संजीवनी

आतापर्यंत ३१ रुग्णांना २४ लाख ३० हजारांची मदत

रत्नागिरी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते २ मे रोजी रत्नागिरी येथे सुरू झालेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून आजपर्यंत ३१ रुग्णांना एकूण २४ लाख ३० हजार रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे.

गुडघा रोपण, मेंदूवरील शस्त्रक्रिया, बालरोग उपचार अशा गंभीर आजारांसाठी ही मदत रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांना वेळेवर मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत. काहींना थेट हॉस्पिटलच्या खात्यात निधी जमा झाला, तर काहींना वैयक्तिक खात्यात मदत मिळाली.

कुलदीप खातू, ओंकार पाटील, अमोल महाडिक, मयुरी तळेकर, पराग भाटकर यांसारख्या लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहाय्यता कक्षातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी सांगितले की, कागदपत्रे सादर केल्यानंतर अतिशय अल्पावधीत मदत मिळाली आणि उपचारांचा मार्ग मोकळा झाला.

रुग्ण आणि नातेवाईकांच्या अनुभवातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष हा सर्वसामान्यांसाठी ‘संजीवनी’ ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.