आर्थिक समृद्धी ही मेहनत व कष्टाने मिळते.
सुंदर इमारत म्हणजे विकास नाही : प्रशासन गतिमान व पारदर्शक तरच विकास शक्य
वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांच्या हस्ते उद्घाटन.
पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, सीईओ रवींद्र खेबुडकर यांची उपस्थिती
वैभववाडी l प्रतिनिधी : पंचायत समितीची सुंदर व सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. मात्र इमारत सुंदर म्हणजे विकास नाही. प्रशासन उत्तम, चाललं असेल तरच विकास होईल. सुंदर इमारतीमधून जनतेला चांगल्या सुविधा व लोकाभिमुख काम होणे गरजेचे आहे. शिस्त, प्रामाणिकपणा व वेळेचे महत्व प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना बंधनकारक आहे. लोकहिताची कामे कायद्यात बसविणा-या अधिकाऱ्यांची आज समाजाला गरज आहे. समृद्धी ही मेहनत व कष्टाने येत असते. पैसा पर्यटनाच्या माध्यमातून घरी येत असतो. त्याला विकास म्हणतात. पर्यटक ही आपली लक्ष्मी आहे. पर्यटनातून मोठ्या प्रमाणात विकास शक्य आहे असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी केले. टक्केवारी ही विकासाला लागलेली कीड आहे. जिल्ह्यातील गरीबी संपविणार अशी शपथ मी घेतली होती. आणि त्या दिशेने मी काम ही केलं असेही खासदार नारायण राणे यांनी सांगितले.
वैभववाडी पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते पार पडला. यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे वैभववाडी नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले. नुतन पंचायत समिती इमारतीचे उद्घाटन व फलकाचे अनावरण खा. नारायण राणे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी पालकमंत्री नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, नगराध्यक्षा श्रद्धा रावराणे, अतिरिक्त मुख्य जिल्हाधिकारी जयप्रकाश परब, कार्यकारी अभियंता श्री सावंत, गटविकास अधिकारी श्री. वालावलकर, श्री. महाले, भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, प्रमोद रावराणे, जयेंद्र रावराणे, नासीर काझी, अरविंद रावराणे, भालचंद्र साठे, सज्जनकाका रावराणे, दिगंबर पाटील, राजेंद्र राणे व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नारायण राणे म्हणाले, जिल्हा परिषदेच्या योजनांची माहिती व त्या कशा राबविल्या जातात. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. वैभववाडी तालुका हा विकसित व्हावा, यासाठी काम झाले पाहिजे. आपण लोकप्रतिनिधी निवडून देतो, ते योग्य काम करतात का ? त्यांची जबाबदारी काय ? ते समजून घेतले पाहिजे. प्रशासन उत्तम तरच विकास होतो. नैतिक जबाबदारी समजून प्रत्येक पदाधिकारी व अधिकारी यांनी काम केलं पाहिजे. आपण शेतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. शेती वाढवून उत्पन्न वाढवले पाहिजे. पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी वेगवेगळे पिके काढतात. त्या पध्दतीने शेती होणे अपेक्षित आहे. आपल्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न पुढील दीड वर्षात एक लाखाने वाढले पाहिजे. त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न करुया.
नारायण राणे पुढे म्हणाले, गरिबी संपवण्यासाठी जिल्ह्यात आलो. त्या दृष्टीने प्रयत्न केले. जिल्ह्यात स्थानिक डॉक्टर, इंजिनियर, वकील व विविध क्षेत्रात जिल्हावासियांनी प्रगती केली आहे. हे पाहून खूप आनंदही होतो.
राजकारणातील हे माझं अकराव पद आहे. चुकीच्या पद्धतीने काम केलं म्हणून कोणीही बोट दाखवू शकत नाही. त्यामुळे पदाधिकारी यांनी देखील चुकीचे वागु नये, काम करणाऱ्या ठेकेदाराला नाहक त्रास देऊ नये.
त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकले जाईल असे त्यांनी सांगितले.
नितेश राणे म्हणाले, वैभववाडी आणि राणे कुटुंब यांचे अतूट नात आहे. २०१४ मध्ये या इमारतीचे भूमिपूजन पार पडले. त्यावेळी आमदार मीच होतो. इमारत पूर्ण होण्यास उशीर झाला ही गोष्ट खरी आहे. परंतु मी मागील आठ वर्ष विरोधी पक्षाचा आमदार होतो. त्यामुळे निधीसाठी भांडावं लागायचे. संघर्ष करत निधी आणला. प्रकल्प होऊ नये यासाठी विरोधकांकडून प्रयत्न होत होते. मात्र महायुतीची सत्ता येताच खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निधीत मागे बघितलं नाही. नवीन वास्तू मधून प्रशासन गतिमान असलं पाहिजे. जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे दर्जेदार हवीत. दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही. नवीन प्रशासकीय इमारत हे तालुक्याचं मंत्रालय आहे. जनतेला योग्य न्याय व प्रश्न सुटले पाहिजेत. कारभार गतिमान व पारदर्शक असला पाहिजे असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. ते पुढे म्हणाले, इमारत सुसज्ज आहे, गतिमान कारभाराची जनतेला अपेक्षा आहे. महाराणा प्रतापसिंह यांच्या नावाने या ठिकाणी सभागृह आहे. निवडून येणाऱ्या प्रतिनिधींनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे सांगितले.
जिल्हाधिकारी अनिल पाटील म्हणाले, वास्तु सुंदर उभी राहिली आहे. या वास्तुतून जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. या वास्तूचा वापर लोकहिताच्या कामासाठी झाला पाहिजे असे सांगितले. रवींद्र खेबुडकर म्हणाले, या तालुक्यात मी काम केलं आहे. या तालुक्यातील आजही काहीजण संपर्कात आहेत. दिव्यांग व्यक्तींच्या लहान गरजा असतात. पण ते जिल्हा परिषद कार्यालयात येत नाहीत. दिव्यांगांना मदत करण्यासाठी प्रत्येक पंचायत समितीला आपण कक्ष सुरू केला आहे. त्याचबरोबर जनतेच्या तक्रार निवारण तात्काळ केली जाईल असे सांगितले. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थित होते.









