चिपळूण–गुहागर मार्गावरील रामपूर घाटात भूस्खलन, वाहतुकीवर परिणाम

चिपळूण – चिपळूण–गुहागर मार्गावरील रामपूर घाटात आज सकाळी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात भूस्खलन होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दगड व माती कोसळली. या घटनेमुळे घाट मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

भूस्खलनानंतर रस्त्यावर माती व मोठमोठे दगड साचल्याने चारचाकी व जड वाहनांना घाट ओलांडणे अशक्य झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीला धाव घेत रस्त्यावर पडलेला मलबा हटवण्याचे काम सुरू केले आहे. प्रशासनाच्या यंत्रणेसह स्थानिक नागरिक युद्धपातळीवर हे काम करीत असून, लवकरात लवकर मार्ग मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोकणात पावसाचा जोर वाढलेला असून चिपळूनसह परिसरात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे प्रवाशांनी घाटमार्गावरील प्रवास टाळावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.