
शहरासह ग्रामीण भागातील गोविंदा पथकांनी दिली सलामी
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी लावली हजेरी
राजापूर (वार्ताहर): शहर आणि तालुका परिसरात शनिवारी पारंपारिक पध्दतीने दहीकाला उत्सव साजरा करण्यात आला. सायंकाळी जवाहरचौक येथे शिवसेना राजापूर शहर प्रमुख सौरभ खडपे आयोजित व आमदार किरण सामंत पुरस्कृत सलग चौथ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवात शहर आणि तालुक्यातील विविध गोविंदा पथकांनी भाग घेत उत्सवाची रंगत वाढवली. या उत्सवाला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीजे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी भेट दिली. ही दहीहंडी पाहण्यासाठी शहर आणि तालुका परिसरातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यातील सहभागी पाच गोविंदा पथकांनी सात मानवी मनोरे रचत दहीहंडीला सलामी देत उपस्थित रसिकांची मने जिंकली. या सर्व पथकांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
शहरात विविध ठिकाणी पारंपारिक दहीहंडया बांधण्यात आल्या होत्या. त्या शहरातील रूमडेवाडी, चव्हाणवाडी, दिवटेवाडी तसेच गुरववाडी, ओगलेवाडी, आंबेवाडी, वरचीपेठ, खडपेवाडी, कोंढेतड धोपटेवाडी येथील गोविंदा पथकांनी फोडत उत्सवाचा आनंद साजरा केला.
सायंकाळच्या सत्रात जवाहरचौक येथे भव्य दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात जुगादेवी गोविंदा पथक तेरवण थोरलीवाडी, हनुमान प्रसन्न खडपेवाडी, निनादेवी गोविंदा पथक कणेरी, धुतपापेश्वर युवक मंडळ राजापूर, शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर, श्री महाकाली गोविंदा पथक आडिवरे, श्री कालिकादेवी गोविंदा पथक भू, वायुपुत्र गोविंदा पथक आंबेवाडी, न्यु हनुमान गोविंदा पथक दिवटेवाडी, बाल गोपाळ मित्रमंडळ राजापूर, वरचीपेठ गोविंदा पथक राजापूर आदी गोविंदा पथकानी उत्सवात सहभागी होत उत्सवाचा आनंद लुटला. यावेळी हनुमान प्रसन्न खडपेवाडी, महाकाली आडिवरे, कालिकादेवी भू, न्यु हनुमान दिवटेवाडी, वरचीपेठ गोविंदा पथकांनी सात थरांचे मनोरे रचत उपस्थित रसिकांची मने जिंकली.
या दहीहंडी उत्सवाला राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत, बापू म्हाप, अपुर्वा सामंत यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते या भव्य दहीहंडी स्पर्धेतील सहभागी पथकांना रोख पारितोषिक व चषक देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना ना. सामंत यांनी सौरभ खडपे यांच्या माध्यमातून गेली चार वर्षे हा दहीहंडी उत्सव राबविला जात आहे. निश्चितच शहरासह ग्रामिण भागातील गोविंदांना स्फुर्ती देणारा उपक्रम आहे. भविष्यात सौरभ खडपे आणि सहकाऱ्यांनी या दही हंडी उत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड देवून विविध लोकहिताचे उपक्रम राबवावेत आपण कायमच त्यांच्या पाठीशी राहु अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना शहर प्रमुख व आयोजक सौरभ खडपे, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष संजय ओगले, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रविंद्र नागरेकर, भाजपा तालुकाध्यक्ष मोहन घुमे, शिवसेना तालुका संपर्क प्रमुख प्रकाश कुवळेकर, अॅड. शशिकांत सुतार, सुशांत मराठे, हर्षदा खानविलकर, सुधीर खडपे, दिपक खडपे, सौ. धनश्री खडपे आदी उपस्थित होते. तर राजापूरचे माजी नगराध्यक्ष एड. जमिर खलिफे यांनीही न्यु हनुमान दिवटेवाडी मंडळासोबत या उत्सवाला हजेरी लावली.
सुत्रसंचालन शैलेंद्र प्रभुदेसाई, खलिल मुजावर यांनी केले. या कार्यक्रमात साईराज ऑकेस्ट्र रत्नागिरीच्या कलाकारांनी सहभागी होत नृत्यकौशल्याद्वारे रसिकांना रिझविले. हा दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी राजापूर शहर व परिसरातील लोकांनी मोठी गर्दी केली होती.











