फोंडाघाट | कुमार नाडकर्णी — शालेय विद्यार्थ्यांना क्रीडांगण मिळावे आणि कबड्डी खेळाचा विकास होऊन, चांगले खेळाडू निर्माण व्हावेत तसेच भविष्यात होणाऱ्या तालुकास्तरीय शालेय कब्बडी स्पर्धाचा सराव होण्याच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी, याकरिता आझाद स्पोर्ट क्लब, फोंडाघाट च्या वतीने आयोजित कणकवली तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा आझाद पटांगणावर आयोजित करण्यात आली. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट शाळेच्या विद्यार्थ्यानी प्रथम क्रमांक तर करूळ हायस्कूल च्या विद्यार्थ्यानी द्वितीय क्रमांक पटकावला.आझाद ज्युदो असोसिएशन, फोंडाघाटच्या मैदानावर आज झालेल्या १७ वर्षाखाली व ५५ किलो वजनी गटांमध्ये कणकवली तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये तालुक्यातील सेंट उर्सूल स्कूल वरवडे, लोरे- वाघेरी हायस्कूल, करूळ हायस्कूल, वामनराव महाडिक हायस्कूल तळेरे,कनेडी हायस्कूल, कासार्डे हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट हायस्कूल, आदी संघांनी सहभाग घेतला होता.
पहिला सेमिफायनल सामना कासार्डे हायस्कूल विरुद्ध फोंडाघाट हायस्कूल दरम्यान झाला.या सामान्यामध्ये अटीतटीच्या झालेल्या लढतीमध्ये सामान गुणांवर सामना टाय झाल्याने स्पर्धेच्या नियमानुसार गोल्डन राईड गुणावर फोंडाघाट हायस्कूल संघ विजयी घोषित केल्याने फोंडाघाट संघाला फायनल मध्ये प्रवेश मिळाला. तर दुसरा सेमी फायनल सामना लोरे – वाघेरी हायस्कूल संघ विरुद्ध करूळ हायस्कूल संघ दरम्यान झाला. हा सामना सुद्धा सुरुवाती पासून अटीतटीचा होऊन या रंगतदार सामन्यामध्ये करूळ हायस्कूल संघाने विजय मिळवत आपला फायनल चा प्रवेश निश्चित केला.फायनल सामना फोंडाघाट हायस्कूल विरुद्ध करूळ हायस्कूल यांच्यामध्ये होऊन मध्यन्तरापर्यंत फोंडाघाट संघाने मोठी आघाडी घेतल्याने काहीसा एकतर्फी वाटणारा सामना मध्यंतरानंतर करूळ हायस्कूल च्या खेळाडूंनी सांघिक कामगिरी चे उत्कृष्ठ प्रदर्शन करत सामना आपल्या बाजूनं आणण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अखेर न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट संघाने मोठ्या गुण फरकाने सामना जिंकत आपल्या विजयाचा शिक्का मोर्तब केला.
या सर्व सामन्यांकारिता पंच म्हणून पाटील सर, बुरांन सर, सत्यवान गुरव, अमित चव्हाण आदिनी काम पहिले. या स्पर्धेच्या विजेत्या न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट संघाला रुपये चार हजार रोख व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेत्या करूळ हायस्कूल संघाला रुपये तीन हजार रोख व आकर्षक चषक देऊन, तृतीय क्रमांकाच्या विजयी कासार्डे हायस्कूल संघास रोख रक्कम व चषक तर उपांत्य फेरीतील पराभूत संघाला रोख बक्षीस आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.तर वैयक्तिक कामगिरीमध्ये उत्कृष्ठ चढाई चे पारितोषिक फोंडाघाट हायस्कूल चा खेळाडू हिमांशू सावंत, उत्कृष्ट पकड चे पारितोषिक करूळ हायस्कूल चा खेळाडू संदेश गोसावी, तर अष्टपैलू खेळाडू चे पारितोषिक फोंडाघाट हायस्कूल चा खेळाडू यश मेस्त्री यांना देण्यात आले. यावेळी सुपर रेड मारणाऱ्या सात खेळाडूंना शिवसेना उपनेते संजय आंग्रे पुरस्कृत रोख बक्षीसे दिली.
आझाद स्पोर्ट क्लब, फोंडाघाट च्या वतीने आयोजित कणकवली तालुका स्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेचे उदघाटन शिवसेना उपनेते संजय आंग्रे, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत माजी जि.प. कृषी पशु संवर्धन सभापती संदेश पटेल उपस्थित होते.तर या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ कणकवली पंचायत समिती माजी सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांच्या समवेत कोंडये सरपंच ऋतुराज तेंडुलकर, फोंडाघाट ग्रा.प. सदस्य पिंटू पटेल,हौशी क्रिकेट मंडळाचे जिल्हाध्यक्ष अनिल हळदीवे उपस्थित होते.या स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी आझाद स्पोर्ट्स क्लब चे अध्यक्ष भाई नराम, मार्गदर्शक विजयसिंह पोफळे सर, दीपक ईस्वलकर, रवी सोलकर, अजिंक्य पोफळे, भाई गुरव,महेश भोगले, शिवाजी पवार, रणजित सोलकर यांच्यासह आझाद स्पोर्ट्स क्लब च्या सर्व सदस्यांनी अथक मेहनत घेतली. बऱ्याच काळानंतर झालेल्या यशस्वी कबड्डी स्पर्धेचा क्रीडा रसिकांनी आनंद घेतला….












