तालुक्यातील भारजा नदीला पूरस्थिती, चिंचघर –मांदिवली पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प.
कुंभार्लीत रहदारीच्या रस्त्यावर मगरींचा मुक्त संचार
भिंगळोली येथील शासकीय विश्रामगृहाजवळील रस्त्यावर पाणी.
मंडणगड : प्रतिनिधी, – मंडणगड तालुक्यात सोमवारी ( दि. 18 ) अतिवृष्टीने तालुक्यातील भारजा नदीला पूरस्थिती निर्माण झाली. भारजा नदीवर असलेल्या चिंचघर – मांदिवली पुलावरून पाणी गेल्याने या मार्गे दापोलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. विसापूर येथे रस्त्यावर पाणी आल्याने खेड, दापोलीकडे जाणारी वाहतूकहि काही काळ खोळंबली होती. भारजा व निवळी या नद्यांसह छोटे – मोठे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला. तालुक्यात मागील तीन दिवस पावसाची संततधार सोमवारी मात्र वाढली. सोमवारी मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे येथील नैमित्तिक जनजीवन मात्र विस्कळीत झाले.
सोमवारच्या धुंवाधार पावसात तालुक्यातील नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आले होते, मंडणगड शहराच्या नजीक असलेल्या भिंगळोली येथील शासकीय विश्रामगृहाजवळील ओढ्याचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली. काही हौसी मंडळींची यामार्गावरून धोका पत्करून वाहतूक करत असल्याचे चित्रही पाहायला मिळाले, तालुक्यातील भारजा, निवळी या नद्यांना पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. चिंचघर –मांदिवली पुलावरून पाणी गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली, यामुळे जावळे, आंबवली वेळास मार्ग बंद झाला. तर मंडणगड ते खेड व दापोलीकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर विसापूर येथील नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने या मार्गावरील मंडणगड मधून खेड व दापोलीकडे जाणारी वाहतूक खोळंबली होती.
शहरातील परिवार पार्क जवळील रस्त्यावर गटाराचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आल्याने पाण्याबरोबर रस्त्यावर वाहून आलेली माती, गाळ व मोठ्या खड्यांमुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला. या गटाराचे बांधकाम लवकर पूर्ण करण्याची मागणी या निमित्ताने करण्यात आली. पावसाचा जोर पाहून शहरातील व तालुक्यातील शाळा भरवून लगेचच सोडण्यात आल्या.
कुंभार्ली येथील शिवशंकर मंदिराच्या परिसरात मगरी आल्या रस्त्यावर –
तालुक्यात मागील तीन दिवस संततधार पावसामुळे कुंभार्ली येथील शिवशंकर मंदिराच्या परिसरात मोठ्या मगरी रहदारीच्या रस्त्यावर संचार करू लागल्याने या परिसरात नागरिकांमध्ये घबराट उडाली. त्यामध्ये दोन ते तीन मोठ्या व अनेक लहान मगरींचे अस्तित्व दिसून येते. सावित्री नदीला लागून असलेल्या परयातून या मगरी तलावापर्यंत पोहचल्या असल्याची व तेथून रस्त्यावर आल्याची शक्यात आहे.












