मघा नक्षत्रामध्ये पावसाची जोरदार मुसंडी

ग्रामीण व शहरी भागात गेले चार दिवस मुसळधार पाऊस
काही ठिकाणी पाणी भरले ; दरडी कोसळल्या

चिपळूण (वार्ताहर) : ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचे मघा नक्षत्र सुरू झाले आणि पावसाने सर्वत्र हाहाकार उडवला. मघा नक्षत्राचे वाहन बेडूक असून दिनांक १६ ऑगस्ट पासून हे नक्षत्र सुरू झाले. गेले तीन दिवस जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी दरड कोसळणे, घरांची पडझड, रस्ते वाहून जाणे अशा घटना घडल्या तर शहरी भागातही पावसामुळे दणादण उडाली आहे.

जून व जुलै या दोन महिन्यांमध्ये पाऊस अतिशय कमी पडला. आताच्या तुलनेत पाऊस पडण्याचं प्रमाण कमी होते. मात्र, ऑगस्ट महिन्यामध्ये मघा नक्षत्र सुरू होताच पावसाने आपले रौद्र रूप धारण केले. गेले चार दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. चिपळूण शहरांमध्ये जोरदार पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी पाणी भरले. तर मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या कामाचा फटका सुद्धा काही नागरिकांना बसला आहे. काही नागरिकांच्या घरांमध्ये या महामार्गावरील येणारे पाणी शिरल्याने नागरिकांचे सुद्धा नुकसान झाले आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात सुद्धा काही ठिकाणी छोटे-मोठे अपघात घडले आहेत. रामपूर घाटात सुद्धा दरड कोसळली होती. त्यानंतर काही ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. पावसाबरोबरच वातावरणात सुद्धा गारवा वाढला आहे. जून जुलै मध्ये एवढा पाऊस पडला नव्हता. तेवढा पाऊस गेले तीन ते चार दिवस पडत आहे. पावसाचे मृग नक्षत्र सुरू झाल्यापासून पाऊस कमी जास्त प्रमाणात पडत होता. मात्र, मघा नक्षत्र सुरू झाले आणि धो धो पाऊस पडू लागला आहे. मघा नक्षत्र असेच लागत राहिले तर परिस्थिती कठीण होऊ शकते. या नक्षत्राचे वाहन बेडूक असून बेडकाला पाऊस हवा असतो असा पूर्वीपासूनचा समज आहे. त्यामुळे ही नक्षत्र बरसणार असे जाणकार बोलत आहेत.
त्यानंतर येणारे नक्षत्र हे पूर्वा असून त्याचे वाहन सुद्धा म्हैस असून गणपती मध्ये सुद्धा पाऊस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, गेल्या तीन दिवसात सर्वत्र पाऊस पडत आहे.