चिपळूण पूरस्थितीची पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून पाहणी

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्याचा मोठा फटका चिपळूण तालुक्याला बसला आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदी इशारा पातळी ओलांडून वाहत असल्यामुळे शहरात पाणी शिरले असून पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच कोळकेवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी चिपळूण शहराला भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत आणि कोणत्या यंत्रणा सज्ज आहेत, याचा आढावा त्यांनी अधिकाऱ्यांसोबत घेतला.

या वेळी बगाटे म्हणाले की, संपूर्ण जिल्ह्यातील पूरस्थितीवर लक्ष ठेवले जात असून राजापूरमधील परिस्थितीवर देखील नियंत्रण ठेवण्यासाठी अप्पर पोलीस अधीक्षकांना रवाना करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असेही त्यांनी आवाहन केले.