गुहागरात मुसळधार पाऊस,अनेक ठिकाणी पडझड

गुहागर | प्रतिनिधी :

गेले काही दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मंगळवारी देखील उसंत घेतलेली नाही.संततधार कोसळणाऱ्या पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत.

संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे वरवेली येथील हसलाई देवी मंदिर येथील प्रवासी पिकअप शेड संपूर्ण जमीनदोस्त झाली.सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.तर कोळवली गवाणवाडी येथील टाकीवर सोमवारी झालेल्या पावसामुळे दरड कोसळली आहे त्यामुळे आसपासची झाडे टाकीवर पडली होती.आरे पिंपळवट वाकी मार्गे पाटपन्हाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाड पडून पूर्ण रस्ता बंद झाला होता वाकी गावातील काही ग्रामस्थांनी मिळून सदर झाड बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला.

जामसुत येथील दीपाली दीपक साळवी यांच्या घरावर झाड पडले असून अंदाजे 8000 रुपयांचे नुकसान झाले.साखरीआगर धरण वाडी येथील शशिकांत नाचरे यांच्या घरालगतची संरक्षण भिंत अतिवृष्टीने पडली.पालपेणे येथील गजानन टाणकर यांच्या गुरांच्या गोठ्याचे नुकसान मुसळधार पावसाने झाले आहे.साखरी त्रिशूळ मोहल्लावाडी येथे विद्युत खांब पडला असून विद्युत पुरवठा बंद झाला आहे.पेठ अंजनवेल भोईवाडी येथे दरड कोसळून पाखाडीचे नुकसान झाले आहे.अंजनवेल अंतर्गत मौजे पेठ अंजनवेल भोईवाडी येथे नूरजहाँ आचरेकर यांच्या घराजवळील टाकीवर दरड कोसळून अंशतः नुकसान झाले आहे.पावसाचा जोर संध्याकाळी देखील कायम होता.