मीठगव्हाणे येथे प्रतिबंधित पान मसाला व सुगंधी तंबाखूसह व्यक्ती अटक

एक लाख 88 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

राजापूर | प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनाने जनहित व जनआरोग्याच्या दृष्टीकोनातून प्रतिबंधित केलेला पान मसाला व सुगंधी तंबाखू अवैधरित्या ताब्यात बाळगणाऱ्या व्यक्तीवर नाट्य पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई 19 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास मीठगव्हाणे – पारवाडी रोडवर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र महादेव शिंदे (वय 27, रा. कोटापूर मेडवई, तालुका राजापूर) हा आरोपी आपल्या मारुती ओमनी गाडी (एमएच-08 एएन 761) मध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ बेकायदेशीररीत्या बाळगत असल्याचे आढळले. त्याच्याकडून 18,216 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत गाडीसह एकूण 1,88,216 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून आरोपीविरुद्ध 19 ऑगस्ट रोजी रात्री 8.31 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाट्य पोलिसांकडून सुरू आहे.