मुंबई :
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणासह राज्यातील अनेक भागात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आज (20 ऑगस्ट) तसेच 21 ऑगस्ट रोजी ठिकठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर वादळी वारे व उग्र समुद्रस्थिती राहणार असून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक, पुणे, कोल्हापूर व सातारा घाटमाथ्यावर अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत वादळासह पाऊस व वीजा कडाडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान विभागाचा इशारा
-
नीचांकी भागात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होऊ शकते.
-
जुनी व कमकुवत झाडे उन्मळून पडण्याची शक्यता.
-
वाहतूक, वीजपुरवठा यासह नागरी सुविधा बाधित होऊ शकतात.
-
शेती व फळबागांना पावसामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता.
-
डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका.
शेतकऱ्यांना सूचना
-
परिपक्व पिकांचे लवकरात लवकर कापणी करून सुरक्षित साठवणूक करावी.
-
भाजीपाला व फळबागांना आधार द्यावा.
-
शेतातील साचलेले पाणी बाहेर काढण्याची सोय करावी.
-
जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे, धोकादायक ठिकाणी न जाण्याचे तसेच अधिकृत संकेतस्थळांवरील अद्ययावत माहिती तपासत राहण्याचे आवाहन केले आहे.









