तळवली हॉस्पिटल स्टॉप ते शेवरीफाटा रस्ता बनला मृत्यूचा सापळा

22 रोजी ग्रामस्थ करणार रस्ता रोको

गुहागर l प्रतिनिधी :तालुक्यातील तळवली हॉस्पिटल स्टॉप ते शेवरीफाटा या रस्त्याच्या कामाला अजूनही मुहूर्त सापडत नाही.गेली कित्येक वर्षे खड्डेमय असणाऱ्या या रस्त्याकडे बघायला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना वेळच नसल्याने अखेर पंचक्रोशीतील संतप्त ग्रामस्थ शुक्रवार दि.22 रोजी रस्ता रोको करणार आहेत.

विशेष म्हणजे या रस्त्यावर अनेक वेळा डागडुजी झाली आहे.यापूर्वी तळवली ग्रामपंचायत,श्री समर्थ बैठक पंथ,भाजपा पक्ष,श्री सुकाई देवी ग्रामदेवता देवस्थान, रिक्षा चालक मालक संघटना यांनी देखील याठिकाणी खड्डे बुजवून प्रवाशांचा प्रवास थोडाफार सुखकर करण्याचा प्रयत्न केला होता.मात्र कालांतराने परिस्थिती “जैसे थे” होत असल्याने नागरिकही अक्षरशः कंटाळले आहेत.मात्र वारंवार निवडून येणाऱ्या आणि केवळ निवडणूका आल्या की धावून हात जोडण्याऱ्या लोकप्रतिनिधींना याचे कोणतेच सोयर-सुतक नाही.त्यामुळे अजून नक्की किती श्रमदानांची अपेक्षा शासनाला आणि लोकप्रतिनिधींना आहे असा सवाल आता संतप्त प्रवासी वर्गातून होत आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या रस्त्याचा विषय चांगलाच गाजला.लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे जाणूनबुजून डोळेझाक करत आहेत याबाबत संताप व्यक्त करण्यात आला.अखेर जनतेची पायाभूत सुविधा असलेल्या रस्त्याचा प्रश्न कित्येक वर्षे सुटत नसल्याने अखेर शुक्रवार दि.22 रोजी रास्तारोको करण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेत करण्यात आला.सदर रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला असून गणेशोत्सवापूर्वी सदर रस्त्याची डागडुजी व्हावी व पावसाळ्यानंतर डांबरीकरण करून ठोस उपाययोजना व्हावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे.