दापोली तालुक्यातील शेतकऱ्यांचे झाले अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान

दापोली :- दापोली तालुक्यात सेंद्रीय भाजीपाला उत्पादकांचे सलग चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


दिनांक १५ ते २०ऑगस्ट झालेल्या मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील वेळवी ,कुडावळे कादिवली या गावांमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले आहे.
या भागामध्ये शंभर टक्के सेंद्रिय शेतीचे उत्पादन घेतले जात होते त्यामुळे दापोलीकरांना सेंद्रिय शेतीचा आस्वाद घेता येऊ लागला होता.
कुडावळे येथील सेंद्रीय शेती तज्ज्ञ शेतकरी विनायक महाजन यांनी या भागातील युवकांना मुंबईत न जाता गावात राहून शेती करून चांगले उत्पन्न मिळवता येते याबाबत मार्गदर्शन केले होते . ग्रामोदय फार्मर्स प्रॉड्यूसर कंपनी या कृषी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे मुंबईत जाणारा युवक हा या परिसरात थांबू लागला आणि चांगल्या प्रकारची सेंद्रीय भाजीपाला शेती येथील युवकांनी सुरू केली होती.
येथील शेतकरी एकनाथ मोरे यांनी माहिती देताना सांगितले की,या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड करण्यात आली होती आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर पीक हाता तोंडाशी आले असताना मुसळधार पावसामुळे येथील सेंद्रीय शेती उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कुडावळे ,वेळवी आणि कादिवली परिसरातून दररोज दापोली बाजारपेठ येथे चिबुड, पडवळ, काकडी , कारली, दुधी भोपळा, माठ आदी प्रकारातील पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर विक्री करिता आणल्या जात होत्या. मात्र ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर झालेल्या नुकसाननामुळे येथील शेतकरी हताश झाला आहे.
या शेतीच्या नुकसानी ची पाहणी करून दापोली पंचायत समिती कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक अधिकारी मर्चंडे मॅडम यांनी पंचनामा केला आहे .त्यानुसार एकूण १७ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे.
गणेशोत्सवाच्या प्रतिवर्षी या भाजीपाल्याची एक ते सव्वा लाख रुपयांची विक्री येथील शेतकरी गणेशोत्सवामध्ये करतात. त्यांचे या वर्षी पूर्ण नुकसान झाले असल्यामुळे शासनाने जास्तीत जास्त नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी दापोली तालुक्यातील वेळवी, कुडावळे आणि कादिवली परिसरातील सेंद्रिय शेती उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.