सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘१०८’ सेवा खासगी रुग्णालयांना जोडा : रुजूल पाटणकर 

पालकमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्षांकडे मागणी 

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्कळीत आरोग्य व्यवस्था आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेमुळे रुग्णांना तातडीच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागतो. मात्र, खासगी रुग्णालयातून पुढील उपचारांसाठी सरकारी रुग्णालयात किंवा गोवा-बांबोळी येथे जायचे असल्यास ‘१०८’ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा नाकारली जात आहे. हा तांत्रिक अडसर दूर करून ही सेवा खासगी रुग्णालयांपर्यंत नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे युवा कार्यकर्ते रुजूल पाटणकर यांनी केली आहे.

या संदर्भात पाटणकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे नेते रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांना निवेदन देऊन धोरणात्मक निर्णय घेण्याची विनंती केली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेकदा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपजिल्हा रुग्णालयात सुविधा नसल्याने रुग्ण खासगी रुग्णालयात दाखल होतो. परंतु, प्रकृती अधिक खालावल्यास त्याला जिल्हा रुग्णालय किंवा गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवावे लागते. अशा वेळी ‘१०८’ च्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधल्यास, “आम्ही खासगी रुग्णालयातून रुग्ण उचलत नाही,” असे सांगून सेवा नाकारली जाते. शासनाच्या या नियमामुळे आपत्कालीन स्थितीत गरीब रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

*आर्थिक भुर्दंड आणि जीविताचा धोका*

खासगी रुग्णवाहिकांचे दर सर्वसामान्य रुग्णांना परवडणारे नसतात. मोफत सरकारी सेवा उपलब्ध असूनही केवळ ‘तांत्रिक’ कारणास्तव ती नाकारली जात असल्याने रुग्णांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. अनेकदा वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाच्या जिवावर बेतल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

*जिल्हा नियोजनकडून निधीची अपेक्षा*

“जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पाहता रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे गरजेचे आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन १०८ सेवेची व्याप्ती वाढवावी, जेणेकरून ही सेवा खासगी रुग्णालयातील गरीब रुग्णांनाही मोफत उपलब्ध होईल,” असे रुजूल पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा हा प्रश्न संवेदनशील असून पालकमंत्र्यांनी यावर तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.