बंदर व मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केली एम टू एम बोटीची घोषणा, सप्टेंबर मध्ये बोट कोकणात जाणार

पालकमंत्री ना. नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत घोषणा

मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून ‘M2M’ नावाची बोट होणार सुरु

जयगड आणि विजयदुर्ग येथे होणार थांबे व ट्रायल फेऱ्या

२५ नॉट्स वेगाने धावणारी दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट

प्रवासी व वाहनांसाठी स्वतंत्र सुविधा, दरांची अधिकृत घोषणा

मुंबई : पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई ते कोकण या मार्गावर रो-रो (Ro-Ro) फेरी सेवा लवकरच सुरु होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. सरकारचा मानस ही सेवा १ किंवा २ सप्टेंबरपासून सुरु करण्याचा असून, हवामान सुधारताच ती कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

ही सेवा सुरु करण्यामागील उद्देश मुंबई ते कोकण प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी करणे हा असून, ‘M2M’ नावाची बोट या मार्गावर धावणार आहे. ही सेवा मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून सुरु होईल. या बोटीला १४७ परवानग्या मिळाल्याची माहितीही राणे यांनी दिली.

 

रो-रो सेवेचा पहिला थांबा जयगड येथे तर दुसरा थांबा विजयदुर्ग येथे असेल. या दोन्ही ठिकाणी लवकरच ट्रायल फेऱ्या घेण्यात येणार आहेत. ही बोट २५ नॉट्स वेगाने धावणार असून, ती दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट ठरणार आहे.

 

या सेवेमुळे मुंबई ते रत्नागिरी प्रवास अवघ्या साडेतीन तासांत तर मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास पाच तासांत पूर्ण होईल. प्रवाशांसाठी एकोनोमीपासून फर्स्ट क्लासपर्यंत विविध श्रेणी उपलब्ध असतील.

 

दरांची घोषणा देखील करण्यात आली असून, इकोनॉमी वर्गासाठी २,५०० रुपये, प्रीमियम इकोनॉमीसाठी ४,००० रुपये, बिझनेस क्लाससाठी ७,५०० रुपये तर फर्स्ट क्लाससाठी ९,००० रुपये आकारले जाणार आहेत. चारचाकी वाहनासाठी ६,००० रुपये आणि मिनीबससाठी १३,००० रुपये इतके शुल्क निश्चित करण्यात आले आहे. या बोटीत एकावेळी ५० चारचाकी वाहने नेता येतील, यासाठी स्वतंत्र डेकची सुविधा उपलब्ध असेल.

 

सध्या ढगाळ हवामानामुळे सेवा सुरु करण्यात काहीसा विलंब होणार असून, १ किंवा २ सप्टेंबरनंतर हवामान खात्याच्या सूचनांनुसार सेवा सुरु केली जाईल. मात्र ही सेवा कायमस्वरूपी राहणार असून, कोकणवासीयांसाठी आणि पर्यटकांसाठी ती मोठा दिलासा ठरणार आहे.

 

या सेवेच्या माध्यमातून रस्त्यावरील प्रदीर्घ प्रवास व वाहतूक कोंडीचा त्रास टाळता येणार असून, कोकणात समुद्रमार्गे जलद व आरामदायी प्रवासाचा नवा अध्याय सुरु होणार आहे.