खेड – ( प्रतिनिधी )
क्रीडा व युवक संचनालय महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या विद्यमाने माध्यमिक विद्यालय तळे येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 14 व 17 वर्षाखालील मुले या गटात प्रथम तर 19 वर्षाखालील मुले या गटात द्वितीय क्रमांक पटकावून यशाला गवसणी घातली.
नुकत्याच माध्यमिक विद्यालय तळे येथे संपन्न झालेल्या तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेकरिता तालुक्यातील 9 शाळांतील संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळामध्ये आपला सहभाग नोंदवून तब्बल 3 संघाजवळ चुरशीची लढत देत 19 वर्षाखालील मुले या गटात व्दितीय क्रमांक पटकावला तर 14 व 17 वर्षाखालील मुले या गटात 9 संघांजवळ लढत देत रोटरी शाळेच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. या यशस्वी संघामधील 14 व 17 वर्षाखालील मुले या रोटरी शाळेच्या फुटबॉल संघाची दिनांक 10 ते 12 सप्टेंबर दरम्यान डेरवण येथे होणार्या जिल्हास्तरीय फूटबॉल स्पर्धेकरिता निवड झाली आहे.
सर्व यशस्वी खेळाडूंना फुटबॉल प्रशिक्षक श्री. कृणाल चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे चेअरमन बिपीनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी फुटबॉल खेळातील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या













