‘गजाल गाथण’ पुस्तकातील कथांचे सोलापूर आकाशवाणीवर अभिवाचन

मालवणी लेखिका पूर्णिमा गावडे मोरजकर यांच्या कार्याचा गौरव

बांदा l प्रतिनिधी :रोणापाल (ता. सावंतवाडी) येथील मालवणी लेखिका सौ. पूर्णिमा गावडे मोरजकर यांच्या ‘गजाल गाथण’ या मालवणी पुस्तकातील कथांचे नुकतेच सोलापूर आकाशवाणीवर अभिवाचन करण्यात आले. मालवणी गजालीतून कोकणी माणसाच्या जीवनाचा वेध घेणाऱ्या ‘गजाल गाथण’ या पुस्तकातील ‘नाळ’ आणि ‘शेवटची घटका’ या दोन कथांचे अभिवाचन आकाशवाणी सोलापूरच्या साहित्य संपदा या कार्यक्रमात सादर झाले. या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

 

लेखिका पूर्णिमा गावडे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. या दर्जेदार पुस्तक लेखनाबद्दल त्यांना बांदा नट वाचनालयाचा प्र. शी. नेरुरकर साहित्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. या पुस्तकातील कथांचे अभिवाचन ऐकून अनेक श्रोते भारावून गेले.

 

नाळ आणि शेवटची घटका या दोन्ही कथा हृदयद्रावक आहेत. अभिवाचन ऐकताना त्या अधिक काळजाला भिडल्या. या अभिवाचनामुळे मालवणी भाषेचा प्रसार होण्यासही मदत झाली आहे, अशी प्रतिक्रिया एका श्रोत्याने दिली. आकाशवाणी सोलापूरने या कथा निवडून त्यांचे अभिवाचन सादर केल्याबद्दल लेखिका आणि त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

———