रत्नागिरी :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराकरीता इच्छुक महिला व्यक्ती व सामाजिक संस्थांकडून २५ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत ०४ प्रतीत अर्ज मागविण्यात येत आहेत. शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करण्याऱ्या महिला व सामाजिक संस्थांना दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरविण्यात येते. सन २०२०-२१ ते सन २०२३-२४ या वर्षांसाठी सदर पुरस्कारासाठी इच्छुक महिला व सामाजिक संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. प्रस्ताव सादर करताना कोणत्या वर्षासाठी प्रस्ताव सादर करत आहेत त्याबाबत प्रस्तावात उल्लेख करावा.
सदर पुरस्काराचे स्वरुप राज्यस्तरीय पुरस्कार, विभागीय पुरस्कार (नोंदणीकृत संस्थेसाठी), जिल्हास्तरीय पुरस्कार आहे. इच्छुक महिला/ सामाजिक संस्थांनी त्यांचा अर्ज (अर्जात पूर्ण पत्ता, शिक्षण, मोबाइल नंबर नमुद करावा). महिला व बाल विकास क्षेत्रातील केलेल्या कार्याचा अनुभव (फोटो व वर्तमान पत्रातील कात्रणे सोबत जोडावीत.) सध्या कोणत्या पदावर कार्यरत आहेत त्याबाबत माहिती, कार्याचा सविस्तर तपशील, शिक्षण, जन्मतारखेचा पुरावा. यापुर्वी इतर पुरस्कार मिळाले असल्यास त्याबाबत माहिती स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो, चारित्र्य चांगले असलेबाबत व कोणत्याही फौजदारी तसेच सार्वजनिक संपत्तीचा अपहार केल्याबाबतचा गुन्हा दाखल नसल्याबाबतचे पोलीस अधिक्षक यांचे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र इत्यादी माहितीसह प्रस्ताव चार प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रत्नागिरी, जेल रोड, रत्नागिरी या कार्यालयास सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय रत्नागिरी, जेल रोड, रत्नागिरी फोन नं. ०२३५२-२२०४६१ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रत्नागिरी यांनी केले आहे.