देहादान महादान – रेशम जाधव; 17 एप्रिल रोजी आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात सहभाग

रत्नागिरी – मृत्यूपश्चात आपला देह विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी उपयोगी यावा या दृष्टीने देहदान महत्त्वाचं असतं. देहदान करतानाच नेत्रदान किंवा त्वचेच दानही करता येतं. देहदान हे महादान आहे यात सर्वांनी सहभागी व्हायला हवं असा संदेश दिला आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव यांनी.
आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर इंद्रधनुष्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून देहदानाची चळवळ का महत्त्वाची आहे? देहदान आणि अवयव दान यातला नेमका फरक काय? देहदान करण्यासाठी कोणते नियम अटी आवश्यक असतात?अशा सर्व बाबींवर अत्यंत सविस्तर पद्धतीने सोनाली सावंत यांनी रेशम जाधव यांच्याशी बातचीत केली आहे. हा कार्यक्रम 17 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आतापर्यंत 14 देहदान केली गेली असून एकूणच हा सगळा प्रवास, या संदर्भात असलेले लोकांचे गैरसमज इत्यादीबद्दल रेशम जाधव यांनी दिलेली माहिती ही अत्यंत उपयुक्त अशी आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे असून हा कार्यक्रम एआयआर रत्नागिरी या यूट्यूब चॅनलवरही ऐकण्यासाठी उपलब्ध होणार आहे.
1143 किलोहर्टस या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 मेगा हर्टझ या एफ एम वाहिनीवर आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर प्रसारित होणारा हा कार्यक्रम श्रोत्यांनी अवश्य ऐकावा असं आवाहन करण्यात आलं आहे.