शिवसेनेच्या पडवे गटाचा ४ सप्टेंबरला मेळावा

पालकमंत्री, गृहराज्यमंत्री उपस्थित राहणार

गुहागर/प्रतिनिधी – गुहागर तालुक्यातील पडवे जिल्हापरिषद गटाचा कार्यकर्ता मेळावा दि.४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आबलोली येथे होणार आहे. यावेळी पालकमंत्री उदय सामंत व गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार असून पडवे गटातील बहुसंख्य कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती माजी जि.प. सदस्य महेश नाटेकर यांनी दिली.

 

गेल्याच महिन्यात झालेल्या वेळणेश्वर गटातील पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी उध्द्व ठाकरे गटाचे वेळणेश्वर गटातील दोन पदाधिकारी, आजी-माजी सभापती, सरपंच शिंदे गटात प्रवेशकर्ते झाले होते. यानंतर पडवे गटाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. याचवेळी पडवे गटातील उपस्थित असलेले महेश नाटेकर यांनी गणेशोत्सवानंतर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते.

पडवे गटाचा हा मेळावा आबलोली येथे मध्यवर्ती ठिकाणी होणार असून या भागातील बहुसंख्य कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री योगेश कदम या मेळाव्याला उपस्थित राहणार असून या मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आल्याचे नाटेकर यांनी सांगितले.