जागतिक स्तरावर सिंधुदुर्गाच्या शिरपेचात मानाचा तुरा : संजू परब यांच्याकडून विशेष सत्कार
सावंतवाडी | प्रतिनिधी
कोकणची वैभवशाली परंपरा असलेल्या दशावतार लोककलेने आता जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. सावंतवाडीचे सुपुत्र आणि नामवंत दशावतार कलाकार गौरव शिर्के यांच्या अद्वितीय कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून, त्यांची ‘वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये अधिकृत नोंद करण्यात आली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी गौरव शिर्के यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्ण सत्कार केला.
दशावतार लोककलेतील उत्कृष्ट सादरीकरण, कलेप्रती असलेली सातत्यपूर्ण साधना आणि ही प्राचीन कला टिकवून ठेवण्यासाठी गौरव शिर्के यांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. त्यांच्या या समर्पणामुळेच त्यांना हा मानाचा सन्मान प्राप्त झाला आहे. पारंपरिक लोकनाट्याला आधुनिक काळात नव्या परिमाणासह जागतिक व्यासपीठावर पोहोचवण्यात गौरव यांचा मोठा वाटा आहे.
वर्ल्ड एक्सलन्स बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून प्रदान करण्यात आलेल्या प्रमाणपत्रात गौरव शिर्के यांच्या मेहनत, समर्पण आणि उल्लेखनीय यशाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे. त्यांच्या या कामगिरीने दशावतार कला क्षेत्रात एक नवा मानदंड (बेन्चमार्क) प्रस्थापित केला असल्याचे संस्थेने नमूद केले आहे.
या यशाची बातमी समजताच कलाक्षेत्रासह सर्वच स्तरांतून गौरव शिर्के यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संजू परब यांनी त्यांचे अभिनंदन करताना म्हटले की, “सावंतवाडीच्या मातीतील एका कलाकाराने आपल्या कलेच्या जोरावर जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित करणे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.” यावेळी त्यांनी गौरव यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सत्कार सोहळ्याप्रसंगी गुरु सावंत, अर्चित पोकळे, नासिर शेख, ज्ञानेश्वर सावंत, जाबेद खतिब यांच्यासह शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौरव शिर्के यांच्या या यशामुळे दशावतार कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील कलेला जागतिक ओळख मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.










